News Flash

गजराजांची संख्या घटली

वने आणि हवामान बदल खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे २७ हजार ३१२ हत्ती आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अधिवासांच्या संरक्षणाअभावी मृत्यूचे प्रमाण वाढले

राखी चव्हाण, नागपूर

भारताने एका शतकापेक्षाही कमी कालावधीत सुमारे ५० टक्के हत्ती गमावले आहेत आणि सध्या अस्तित्वात असलेले हत्ती अन्न आणि पाण्यासाठी लढा देत आहेत. या डौलदार गजराजांचे आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाने केली आहे. त्या अनुषंगाने १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नवी दिल्ली येथे गजमहोत्सव साजरा करण्यात आला.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे २७ हजार ३१२ हत्ती आहेत. जगभरातील हत्तींच्या संख्येपैकी ५५ टक्के इतकी ही संख्या आहे. सुमारे १४ ते १५ राज्यातील २९ हत्ती संरक्षित क्षेत्र आणि हत्तींचा अधिवास असणाऱ्या दहा क्षेत्रातून ही आकडेवारी समोर आली आहे. भारतातील मोठय़ा सस्तन प्राण्यापैकी हत्ती एक असून त्यांचा कॉरिडॉर नष्ट होत असल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. हत्तींच्या बहुतांश अधिवासांमधून रेल्वेमार्ग गेले आहेत. या मार्गावर रेल्वेची गती कमी असावी, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, दुर्लक्षामुळे रेल्वेच्या धडकेत हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय वीजप्रवाहामुळेदेखील हत्तीचे सर्वाधिक मृत्यू होतात. कारण बरेचदा वीजतारा लोंबकळत असतात. वीजतारांनाही सोंडेने स्पर्श केला तरीदेखील त्यांचा मृत्यू होतो. हत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान अधिक आहे आणि ते वाचवण्यासाठी वीजप्रवाहाचा वापर केला जातो. यात हत्तीचा मृत्यू होतो. भारतात गेल्या दहा वर्षांत सुमारे ४८२ हत्ती केवळ वीज प्रवाहामुळे मृत्युमुखी पडले आहेत. जंगलाचा निकृष्ट दर्जा, पारंपरिक जंगल मार्गाचा नाश हेदेखील हत्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले आहेत. यामुळे हत्ती गावाकडे येत असून हत्ती आणि मानव संघर्ष उफाळून आला आहे. हत्ती हा जंगलाचा उत्तम रचनाकार मानला जातो. मात्र, त्यांनाच त्यांचा अधिवास मिळत नसल्याने जंगलाची निर्मितीप्रक्रिया थंडावली आहे. हे सर्व घटक लक्षात घेऊनच केरळ, कर्नाटक, ओडिसा, मेघालय, तामिळनाडू, छत्तीसगड या राज्यातील सुमारे शंभराहून अधिक कॉरिडॉरच्या सुरक्षेची मागणी वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाने केली आहे. गेल्या पाच वर्षांत या संस्थेच्या स्वयंसेवींनी अतिशय मेहनत घेऊन १४  राज्यांमधील हत्तींचे कॉरिडॉर चिन्हांकित केले आहेत. या क्षेत्रात हत्ती आणि त्यांचे कळप त्यांचे आयुष्य जगतात. त्यामुळे या ठिकाणी महामार्ग, पूल, धरण, सिंचन प्रकल्प, हॉटेल, रिसॉर्ट, रेल्वेलाइन आदीच्या बांधकामास बंदी घातली जावी, अशी त्यांची मागणी आहे.

वाघांची संख्या कमी झाल्याची देशभरात चर्चा होते, त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नही होतात, पण वाघांप्रमाणेच हत्तीची संख्याही कमीकमी होत आहे. सरकारने काही वर्षांपूर्वी ‘प्रोजेक्ट एलिफंट’ हा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र, या प्रकल्पाचे काय झाले कुणालाही ठाऊक नाही.

दरवर्षी १०० हत्ती रेल्वेखाली येतात

दरवर्षी सुमारे १०० हत्ती रेल्वे अपघातात मृत पावतात किंवा हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाचा बदला घेण्यासाठी लोक त्यांना मारतात. हत्तीच्या हल्ल्यात सुमारे ४५० मानवी मृत्यू होत असून हजारो हेक्टर शेतजमीन खराब झाली आहे.

आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) दरवर्षी संकटग्रस्त प्रजातीतील वन्यप्राण्यांची यादी जाहीर करते. या यादीत अफ्रिकेतील हत्ती असुरक्षित गटात तर आशियाई हत्ती संकटग्रस्त गटात आहेत.

हत्तीच्या संरक्षणासाठी २००७ मध्ये रॉटरडॅम येथून हत्ती महोत्सवाची सुरुवात झाली. हत्तीचा अधिवास आणि खाद्यान्नाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच मानवी वस्ती आणि अतिक्रमणातून हत्तीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ‘एलिफंट फॅमिली’ ही संस्था जगातील अनेक देशात कार्य करते. भारतात केरळ आणि आसाममध्ये हत्तींचा अधिवास संरक्षित करण्यासाठी संस्था कार्यरत असून केरळमध्ये ३७ तर आसाममध्ये ४२ कुटुंबाचे जंगलातून अन्यत्र स्थलांतरही करण्यात आले आहे. हत्तीच्या मदतीसाठी विविध प्रकल्प राबण्याकरिता संस्थेला सुमारे ४१ लाख अमेरिकन डॉलर्स इतक्या निधीची गरज आहे.

हत्तीची सर्वाधिक संख्या असणारे राज्य

कर्नाटक ६०४९

आसाम  ५७१९

केरळ   ३०५४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 4:06 am

Web Title: elephant population declines by 50 percent in india
Next Stories
1 खासगी कंपन्यांमुळे महापालिकेची तिजोरी कोरडी
2 ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’च्या नियमावली वादावर पडदा
3 स्वच्छतेसाठी कोटय़वधीचा खर्च, तरही सर्वत्र कचरा
Just Now!
X