उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किसान पार्सल रेल्वे चांगलीच लाभदायक ठरत असून या भागातून उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणावर डाळिंबाची वाहतूक केली जात आहे. मागील एक महिन्यापासून आतापर्यंत ११०० टनपेक्षा जास्त वाहतूक झाली आहे. किसान रेल्वे आता आठवडय़ातून तीन वेळा धावत असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे लाभ होत आहे.

किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. डाळिंब, सिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, मासे, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्यांची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून केली जात आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी डाळिंबाची वाहतूक ११२७.६७ टन एवढी आहे. ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे ६१ टक्के आहे. किसान रेल्वे ७ ऑगस्ट २०२० रोजी देवळाली ते दानापूपर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूपर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यानंतर सांगोला, पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल आठवडय़ातून तीन वेळा धावत आहे.

जीवनसत्त्वांनी भरपूर अशा डाळिंबाचे नाशिक, पुणे आणि सोलापूर या भागात मोठय़ा प्रमाणात उत्पादन होत आहे. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मते डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण उत्पादनात राज्याचा वाटा ६२.९१ टक्के  आहे. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंचा ताजा पुरवठा, मालाच्या संख्येवर बंधन नाही. रस्तेवाहतुकीपेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी तसेच त्यामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळाली आहे.

किसान रेल्वेमुळे कमी वेळेत वाहतूक होते. ताजी वस्तू कमी वेळेत बाजारात जात असल्याने फळांच्या मागणीत वाढ होत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याबद्दल पुणे येथील अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक सशोधन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केळीच्या पुरवठय़ाविषयी चर्चा

भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी केळी व्यापाऱ्यांशी दृक्श्राव्य माध्यमाद्वारे ऑनलाइन चर्चा केली. भविष्यात केळीचा पुरवठा वाढविण्यासंदर्भात रावेर, निंभोरा, सावदा येथील व्यापाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरुण कुमार यांनीही चर्चेत सहभाग घेतला. रेल्वे प्रशासनाद्वारे व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. मंडल रेल प्रबंधक गुप्ता यांनी सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. व्यापारी संघाने भविष्यात केळीची वाहतूक सुरू करण्याबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. चर्चेत वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के . शर्मा, केळी व्यापारी संघाकडून डी. के . महाजन, हरीश गनवाणी, रामदास पाटील, कडु पाटील, भागवत पाटील, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनीही सहभाग घेतला.