News Flash

तुरीला क्विंटलला विक्रमी अकरा हजार रुपये भाव

ग्राहकांची वाढती मागणी व बाजारात घटलेली आवक याची परिणती मंगळवारी लातूर बाजारपेठेत तुरीचा भाव क्विंटलला १० हजार ७०० रुपये,

| August 19, 2015 05:08 am

ग्राहकांची वाढती मागणी व बाजारात घटलेली आवक याची परिणती मंगळवारी लातूर बाजारपेठेत तुरीचा भाव क्विंटलला १० हजार ७०० रुपये, तर शेजारच्या गुलबर्गा येथील बाजारपेठेत ११ हजार १०० रुपये भाव वधारण्यात झाल्याचे चित्र आहे.
तुरीचे विक्रमी उत्पादन होणाऱ्या मराठवाडा, आंध्र प्रदेश व कर्नाटक परिसरात या वर्षी खरीप हंगाम पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने पूर्णपणे धोक्यात आला. परिणामी यंदा तुरीचे उत्पादन जवळपास नगण्यच आहे. गतवर्षीही पुरेसे उत्पादन नव्हते. त्यामुळे ४ हजार ३०० रुपये हमीभाव असलेल्या तुरीला पहिल्यांदाच एवढा प्रचंड भाव मिळत आहे. केंद्रातील सरकारने डाळ कमी पडू दिली जाणार नाही. विदेशातून ती आयात करण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जगभरातच तुरीच्या उत्पादनाचा तुटवडा असल्यामुळे तुरीची आवक मात्र थंडावली आहे.
बर्मा देशातून आयात होणारी तूर कमी असून विदेशातून आवक होण्याची शक्यताही सध्या नाही. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी लातूर बाजारपेठेत तुरीची केवळ १० क्विंटल आवक राहिल्याचे डाळ मिल असोसिएशनचे अध्यक्ष हुकूमचंद कलंत्री यांनी सांगितले. सध्या तूर डाळीचा बाजारातील किरकोळ विक्रीचा भाव १३७ रुपये किलो आहे.
अजून किमान महिनाभर तरी आवक वाढणार नसल्यामुळे डाळीचा भाव १५० रुपये किलो, तर तुरीचा भाव ११ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या १५ सप्टेंबरनंतर आफ्रिकेतील तुरीचे उत्पादन बाजारपेठेत येईल. त्यानंतर तुरीची आयातही होईल. शिवाय मध्य प्रदेश, राजस्थान व विदर्भात मुगाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होऊन बाजारपेठेत दाखल होईल. त्यातून तूर डाळीचा भाव १२० रुपये किलोपर्यंत खाली येण्याची आणि तुरीचा भाव किमान १० हजार रुपये क्विंटलवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या वतीने साखरेची निर्यात मोठय़ा प्रमाणात करून त्या बदल्यात डाळीची आयात करण्याचा घाट गेल्या काही दिवसांपासून घातला जात आहे. या संबंधी तातडीने निर्णय करून सप्टेंबर महिन्यात याची अंमलबजावणी झाल्यास दिवाळीत डाळीचे भाव गगनाला भिडण्यावाचून स्थिर करता येतील अन्यथा ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 5:08 am

Web Title: eleven thousand rupees per quintal rate for toor dal
Next Stories
1 साधुग्राम प्रवेशद्वाराला विविध संदर्भाचे कोंदण
2 ‘मनरेगा’च्या निधीचा ओघ आटला
3 सापाचे १ मिलिग्रॅम विष दीड लाखाला
Just Now!
X