शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून घडणारे वाहने जाळण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा शहराच्या काही भागांत तब्बल ११ वाहने जाळण्यात आली. वाळूजजवळील बजाजनगर येथे चारचाकीसह ३, तर शहरातील जयभवानीनगर येथे ८ दुचाक्यांना माथेफिरूंनी आग लावली. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांच्या कार्यपद्धतीपुढे माथेफिरूंनी या रूपाने मोठेच आव्हान उभे केले आहे. वाहने पेटवून देणाऱ्यांचा पोलिसांनी एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी भावना ज्यांची वाहने या आगीत सापडली, त्या वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीजवळील बजाजनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून लहानमोठय़ा प्रमाणात दुचाकी वाहने रात्रीच्या वेळी पेटवून देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. रात्री पोलिसांची गस्त होऊन गेल्यावर प्रामुख्याने हे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. गेल्याच महिन्यात प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशी वाहने जाळणाऱ्या माथेफिरूंना गोळीबार करून पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अंधाराचा फायदा घेत माथेफिरू पळून गेला. गोळीबाराच्या प्रकारामुळे मध्यंतरी काही दिवस वाहने जाळण्याचे प्रकार थांबले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नव्याने दुचाकी पेटवून देण्याच्या प्रकारांनी डोके वर काढले आहे. गेल्या आठवडय़ात बजाजनगर, जयभवानीनगर भागात दुचाकी जाळण्याचे प्रकार घडल्यानंतर शुक्रवारी रात्रीतून पुन्हा मोठय़ा संख्येने दुचाकी पेटवून देण्यात आल्या. सिडको भागात जिजामाता कॉलनीमध्ये एकाच रात्री आठ दुचाक्या जाळण्यात आल्या. घरासमोर उभ्या केलेल्या या गाडय़ा कोणातरी अज्ञात माथेफिरूने पहाटे तीन-चारच्या दरम्यान पेटवून दिल्या. एमएच २० डीके ३८०७, एमएच २० सीई १३८६, एमएच २० सीव्ही २५२, एमएच २० सीव्ही ३३९९, एमएच २० एएच २२३०, एमएच २० एई ५५२३, एमएच २० झेड ६५९४ व एमएच २० एएस २१५२ या गाडय़ा पेटविण्यात आल्या. या संदर्भात खिसोर काशिनाथ पाटील (जिजामाता कॉलनी, एन २) यांनी मुकुंदवाडी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत एका आल्टो मोटारीसह अन्य दोन दुचाक्या जाळण्यात आल्या. एमएच २० सीएस ९९१२ ही आल्टो मोटार, तसेच एमएच २० टीएल २४२४, एमएच २० सीई ४०९७ या दुचाक्या माथेफिरूंनी पेटवून दिल्या. या संदर्भात परवीन भीमराज आल्हाट (बजाजनगर) यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.