भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात झारखंडमध्ये फादर स्टेन स्वामी यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांचे पथक पोहोचले असून पोलिसांच्या पथकाने स्टेन यांच्या घराची झाडाझडती घेतली.  पोलिसांनी स्टेन यांच्या घरातील डिजिटल उपकरण आणि अन्य काही महत्वाचा दस्तावेज जप्त केला आहे.

भीमा-कोरेगाव येथे जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलीस तपास करत असून भीमा-कोरेगाव हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी नक्षली समर्थकांना अटक केली होती.  एल्गार परिषदेत झारखंडमधील मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी हे देखील उपस्थित होते.

पुणे पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री झारखंडमध्ये पोहोचले. बुधवारी पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी स्वामी यांच्या घरातून डिजिटल उपकरण आणि अन्य महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केला आहे.  स्टेन स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांनी वर्षभरात दुसऱ्यांदा छापा टाकला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्येही पोलिसांनी स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी स्टेन स्वामी यांच्या घरातून लॅपटॉप, पेनड्राइव्ह, सीडी आणि मोबाइल जप्त केले होते.

कोण आहेत फादर स्टेन स्वामी ?
फादर स्टेन स्वामी हे गेल्या ५० वर्षांपासून झारखंडमध्ये कार्यरत आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. आदिवासींच्या हक्कांसाठी देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते मूळचे केरळमधील रहिवासी आहेत. झारखंडमध्ये नक्षलींशी संबंध असल्याच्या खोट्या आरोपांवरुन तुरुंगात टाकलेल्या आदिवासींच्या सुटकेसाठी स्वामी स्टेन काम करतात, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.