22 September 2020

News Flash

Elgaar parishad case: अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं आहे

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  वेरनोन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरूण परेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

विशेष न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी गोन्साल्विस, अ‍ॅड. परेरा आंना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. भारद्वाज, परेरा, गोन्साल्विस यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. बचाव पक्षाच्या वकिलांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सरकार तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने शुक्रवारी तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान सुधा भारद्वाज यांना हरियाणामधील फरियादाबाद येथील त्यांच्या निवासस्थानावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना दुपारी पुणे न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पुणे पोलिसांना मुदतवाढ दिली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ बेकायदेशीर ठरवत ती रद्द केली. दरम्यान, महाधिवक्त्यांच्या विनंतीनुसार या आदेशाला १ नोव्हेंबपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

अटकेमागची कारणे
बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ऑगस्ट महिन्यात पुणे पोलिसांच्या पथकाने सुधा भारद्वाज, तेलगू कवी वरवरा राव, वेरनोन गोन्साल्विस, अरूण परेरा, गौतम नवलाखा यांना अटक केली होती. शहरी भागात नक्षल कारवाया करणे, देशातील व्यवस्था उलथवून अराजक माजवण्याचा कट रचणे असा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला. त्यांच्याविरोधात यूपीए (विघातक कृत्य प्रतिबंधक कायदा) कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाडयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांना अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून कागदपत्रे, लॅपटॉप, पत्रे जप्त करण्यात आली. बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या प्रमुखांशी ते संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 9:40 am

Web Title: elgaar parishad case arun ferreira vernon gonsalves produced in court
Next Stories
1 कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात आणखी दोघे अटकेत
2 गोन्साल्विस, परेरा पुन्हा अटकेत
3 महापालिकेडून बनवाबनवी
Just Now!
X