एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी शंका उपस्थित केली आहे. एल्गार परिषद प्रकरणात संबंध नसलेल्या आणि कार्यक्रमाला हजर नसलेल्या लोकांवर खटले भरण्यात आले. दोन वर्षांपासून हे लोक तुरूंगात आहेत. त्यांची सुटका व्हावी म्हणून आणि योग्य तपास व्हावा म्हणून मी राज्य सरकारकडे या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र, बैठकीनंतर लगेच केंद्र सरकारला माहिती कुणी दिली?,” असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे.

शरद पवारांनी एल्गार परिषदेसंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. पवार म्हणाले,”एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. १०० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं,” असा आरोप पवार यांनी केला.

आणखी वाचा – एल्गार परिषद : सुधीर ढवळेंना नामदेव ढसाळांच्या ‘या’ कवितेमुळे अटक करण्यात आली

“या प्रकरणाची चौकशी करावी म्हणून मी राज्य सरकारकडं मागणी केली. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात बैठक घेतली. ९ ते ११ वाजता ही बैठक झाली. त्यानंतर चार वाजता हा तपास आमच्याकडं द्यावा, असं केंद्र सरकारनं राज्याला सांगितलं. जर राज्य सरकारनं याविषयी केंद्राला काहीही माहिती दिली नाही. तर केंद्रानं इतकी तत्परता का दाखवली. केंद्र सरकारला कुणी माहिती. अधिकाऱ्यांनी हा उद्योग केला आहे का? कारण एल्गार परिषदेचा तपास करण्याकडं रोख होता. त्यामुळेच हा तपास काढून घेण्यात आला का?,” असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.