पुढील टप्प्यात शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याची मागणी

पुणे : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यात २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात १० हजार एक जागाच भरल्या जात असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, त्याच वेळी नऊ वर्षांनंतर भरती होणार असल्याचे समाधानही असून, पुढील टप्प्यात सर्व रिक्त जागा भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

पवित्र संकेतस्थळामार्फत राज्यात शिक्षक भरती करण्यात येणार आहे. आरक्षण, बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात बराच कालावधी गेला. त्यामुळे भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, २८ फेब्रुवारीला राज्य सरकारने १० हजार १ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि काही खासगी शाळांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाईल, मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागांवर भरती होणार असल्याने पात्रताधारक उमेदवार नाराज आहेत.

राज्य सरकारने २४ हजार जागांवर भरती न केल्याने पात्रताधारकांमध्ये नाराजी आहे. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेमतेम सहा हजार जागा उपलब्ध झाल्या आहेत. नऊ वर्षांनी भरती होत असताना एवढय़ा कमी जागांवर भरती होणे पटणारे नाही. मात्र किमान रखडलेली प्रक्रिया सुरू झाली याचे समाधान आहे. रिक्त सर्व जागा भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत राहणार असल्याचे डीएड-बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे संस्थापक संतोष मगर यांनी सांगितले. राज्य सरकारने २४ हजार जागांवर भरती करण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, मात्र पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. या भरती प्रक्रियेतून गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळतील, असे पात्रताधारक विठ्ठल सरगर यांनी सांगितले.

आचारसंहितेपूर्वी ११ ते १२ हजार जागांवर शिक्षक भरती करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही संस्थांना मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्या दृष्टीने युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात येत आहे.

– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त