एलन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची अखेर भारतात एंट्री झाली असून कंपनीने भारतातील आपल्या व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली. बंगळुरूमध्ये कंपनी रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटर उघडणार आहे. महाराष्ट्राला डावलून टेस्लाने बंगळुरूची निवड केल्याने राजकारणालाही सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी टेस्लाने महाराष्ट्राऐवजी बंगळुरूची निवड केल्याने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं, त्यावरुन देशपांडे यांनी “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असं ट्विट करत आदित्य यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी एक आशा पल्लवीत करणारं विधान केलं आहे.

आणखी वाचा- “भारतात पाऊल ठेवण्यासाठी Tesla ने 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आज…”

“टेस्लाने रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली असली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. यासोबतच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे टेस्लासह ई-वाहन कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ट्विटरद्वारे रोहित पवारांनी ही माहिती दिली आहे. रोहित पवारांनी केलेल्या या विधानामुळे टेस्ला महाराष्ट्रात येण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.

आणखी वाचा- ‘बोलाची कढी, बोलाचा भात’, Tesla कर्नाटकला गेल्याने मनसेने आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

दरम्यान, एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ (Tesla Motors India and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) नावाने बंगळुरूत रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेईल. टेस्ला ‘मॉडेल 3 ’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे. मॉडेल 3 ही सेडान प्रकारातली कार असून ती 0 ते 100 किमीप्रतितास इतका वेग केवळ 3.1 सेकंदात गाठू शकते. याची रेंज 500 किमी पेक्षा अधिक आहे.