महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्य़ातील १४१ जणांनी सुमारे ९२ लाखांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या सर्वाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपकी ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठय़ांपेक्षा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांची माहिती तलाठय़ांमार्फत उपलब्ध करून शासकीय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. मिरज तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांची यादी वगळता जिल्ह्य़ातील कर्जखात्यांची शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अहवालानुसार एकूण १४१ व्यक्तींनी या योजनेचा गरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

वाळवा तालुक्यातील गोटिखडी येथील वित्तीय संस्थेमध्ये ७/१२ नसताना कर्जवाटप करून कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने १२ व्यक्तींवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.