News Flash

खार्डी गावात शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व उदयास

१५०० वर्षे जुन्या इतिहासाचा मागोवा; गधेगळ शिलेचे ऐतिहासिक महत्त्व

(संग्रहित छायाचित्र)

पालघर तालुक्यातील दातिवरे गावाजवळील खार्डी येथे शिलाहारकालीन गधेगळ शिलेचे अस्तित्व प्रकाशित झाले असून याच गावांमध्ये १५०० वर्षे जुने शिलाहारकालीन मंदिराचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खार्डी गावाच्या शिलाहारकालीन पुराव्यांनी इतिहासाला नव्याने साद घातली आहे.

‘किल्ले वसई मोहीम परिवारा’ अंतर्गत गुढीपाडव्याच्या प्रसंगी खार्डी गावातील वाघ देवाची डोंगरी मंदिराच्या मागे, मालेपाडा मानपाडा यांच्या हद्दीवर शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळेचे ऐतिहासिक महत्त्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध व प्रकाशित करण्यात आले. खर्डी येथील दुर्गप्रेमी योगेश विश्वनाथ भोईर यांनी या शिलालेखाची माहिती डॉ. श्रीदत्त राऊत यांना दिल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी या शिळेचा प्रथम वेध घेण्यात आला होता.

दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. उत्तर कोकणात शिलाहारांचा कालावधी इ.स. ८०० ते १२६५ असा सुमारे ४०० वर्षांचा मानण्यात येतो. वसई किरवली व पालघर तालुक्यातील खार्डी येथे मिळालेल्या अवशेषावरून हे साम्राज्य १२७१ पर्यंत असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. खार्डी गावातील उपलब्ध झालेला शिलालेख ११ व १२ व्या शतकातील इतिहासाची मूक पाने बोलकी करणार आहे.

या गावातील तलावामध्ये काही वर्षांपूर्वी भग्नावस्थेमधील काही मूत्र्या सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अधिक अभ्यास केल्यानंतर सुमारे पंधराशे वर्षे जुना असणाऱ्या दोन हजारहून अधिक विटा सापडले असून शिलाहार मंदिराचे अस्तित्व उदयास आले. या मंदिराची स्थाननिश्चिती झाली असल्याचे डॉ. श्रीदत्त राऊत यांनी लोकसत्तेला सांगितले.

११ व १२ व्या शतकातील इतिहास बोलका

ऐतिहासिक संदर्भाचा मागोवा घेताना दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौल साम्राज्यापर्यंत पसरलेली होती आणि सुमारे सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिल्ह््याचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा समावेश होतो. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीकाजुर्न, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी इ.स ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो. यात प्रथम कपर्दी, पुलशक्तीपासून ते तृतीय अनंतदेव, सोमेश्वर असा समावेश होतो. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. किरवली येथील शिलालेख लक्षात घेता नवीन संशोधनानुसार शिलाहार राजा तिसरा अनंतदेव शके ११७० असा कालखंड पुढे जातो. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू व अवशेष पालघर प्रांतांत विखुरलेल्या आहेत.

* या शिलालेखाचा पुरातत्वीय पद्धतीने सलग २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विविध ठसे घेण्यात आलेले असून त्याचे संशोधनपर वाचन पूर्ण करण्यात आलेले आहे. या शिलालेखाचा तपशील गॅझेटियर विभाग, विविध लेखमाला शासकीय व संशोधन त्रैमासिक माध्यमातून अभ्यासकांपर्यंत प्रसिद्ध होण्यासाठी सादर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षात उन्ह, पाऊस, वारा या नैसर्गिक प्रभावात शेवाळ, माती, चिखल साचून हे शिलालेख पूर्णपणे दुर्लक्षित होऊन या शिळा नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.

शिलालेखाचा तपशील

८१ सेंमी उंची व ३७ सेंमी रुंदी, एकूण १० ओळी, पहिली ओळ अपूर्ण, पुढील ४ ओळी त्यातील काही मजकूर अक्षरे वाचनीय, गद्धेगाळ शिल्प स्पष्ट ३० सेंमी रुंदी २.५मीटर उंची चौकोनी, चंद्र सूर्य प्रतिमा स्पष्ट इत्यादी  बाबींचा तपशील प्रथमच सविस्तर पद्धतीने संकलित करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:53 am

Web Title: emergence of shilahar period temple in khardi village abn 97
Next Stories
1 वाढीव ‘पॅकेज’मुळे व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसनाला गती मिळणार?
2 पंढरीचा विठोबा कोणाला पावणार?
3 सांगलीत लसीकरणाला वेग
Just Now!
X