एकाच कुटुंबात २३ रुग्ण सापडल्याने शहराला हादरा; पोलिसांचा वेढा; वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक दाखल

इस्लामपूरमधील एका कुटुंबातील २३ रुग्ण करोनाग्रस्त आढळल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले असून उद्या रविवारपासून तीन दिवसांसाठी शहरात शंभर टक्के ‘लॉकडाउन’चा निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण शहर सील करण्यात आले आहे. करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखालील तीन वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक शनिवारी मिरजेत दाखल झाले आहे तर करोना चाचणी ३१ मार्चपासून मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्य़ात आढळून आलेले करोनाबाधित रुग्ण इस्लामपूर येथील एका कुटुंबाच्या संपर्कात असल्याने खळबळ माजली आहे. या करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ३३७ जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यांनाही विलगीकरण खोलीत राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

इस्लामपूर शहर रविवारपासून सलग तीन दिवस १०० टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या नगरपालिकेच्या बठकीत घेण्यात आला. या दरम्यान शहरातील नागरिकांना दूध, किराणा सामान काहीही उपलब्ध असणार नाही. फक्त  विषम तारखेला मेडिकल सुरू ठेवली जाणार आहेत. या तीन दिवसांनंतर पुढे काय करायचे या बाबतचा निर्णय मंगळवारनंतर घेण्यात येणार आहे.  शहरातील बँका, पतसंस्था यांनीही या तीन दिवसात व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनी केले आहे. तीन दिवस बंद ठेवून करोनाचे साखळी तोडण्यासाठी लोकांचा एकमेकांशी येणारा संपर्क थांबावा, म्हणून हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा सव्‍‌र्हे करून यादी करण्यात आली असून या यादीमध्ये सध्या ३३७ जणांचा समावेश आहे. या सर्वाना अद्याप कोणताही त्रास होत नसला, तरी आरोग्य विभाग सतर्क आहे. या शिवाय आणखीही काही जणांचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच करोनाबाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या ३८ जणांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या परिस्थितीचा अभ्यास करून तातडीने उपचार करण्यासाठी राज्य शासनाने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली असून सध्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार श्रीमती सापळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. समितीमध्ये श्रीमती सापळे यांच्यासह डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवारी यांचा समावेश आहे. करोनाग्रस्त रुग्णांसाठी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये १५० खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच करोना रुग्णांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी आवश्यक यंत्र सामग्री मिरजेत उपलब्ध करण्यात आली असून प्रशिक्षणासाठी काही कर्मचारी पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून मिरजेच्या प्रयोगशाळेत करोना साथीची पडताळणी करण्यासाठीची प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.