वसई: वसईच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमी वर तालुका वैद्यकीय आरोग्य विभागाकडून लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत १२ हजार ६३३ नागरिकांचे लसीकरण करून झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ग्रामीण भागासाठी विरार ग्रामीण रुग्णालय व आगाशी, निर्मळ, कामण, भाताने, नवघर, पारोळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू केले आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिक व त्यानंतर ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीणमध्ये सुरुवातीला लस घेण्यासाठी नागरिक हे पुढे येत नव्हते. मात्र जसा  जसा करोनाचा कहर वाढू लागला तसे नागरिक हे लसीकरण करवून घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर जाऊ लागले आहेत.

आतापर्यंत ग्रामीणसाठी एकूण १३ हजार ३६० इतके लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत.त्यातील १२ हजार ६३३ डोस लसीकरणासाठी वापरण्यात आले असून, सद्यस्थितीत ७२७ एवढय़ा लशी शिल्लक असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी दिली आहे.