महावितरणकडून  शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

अमरावती : महावितरण प्रशासनाच्या अन्यायाविरोधात ९ जुलैपासून कार्यालयासमोर उपोषणास बसलेले निखिल तिखे यांनी १९ जुलै रोजी होणारा आपला विवाह उपोषण मंडपातच  पार पाडण्याचा निर्धार केला असून गुरुवारी त्यांना उपोषण मंडपातच हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र, उपोषणकर्त्यांनी महावितरणची प्रतिमा मलीन केल्याचे सांगून शिस्तभंगाचा ठपका ठेवत कठोर कारवाई करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

महावितरणने बदल्या व प्रशासकीय पदस्थापनेत वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने ९ जुलैपासून उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मुख्य अभियंता कार्यालय ‘ऊर्जा भवन’समोर निखिल तिखे, प्रशांत दंडाळे, मनोहर उईके, राजीव येडतकर, दीपाली ठाकरे, नरेंद्र वंजारी आदींनी  उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांपैकी निखिल तिखे यांच्या विवाहाचा आज मुहूर्त आहे. उपोषणात सहभागी असल्याने ते घरी जाऊ  शकत नाहीत. त्यामुळे  वर निखिल व वधू पूजा लंगडे यांचा विवाह दोन्ही पक्षांकडील मंडळींनी उपोषणस्थळीच लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी दुपारी नवरदेवाला उपोषण मंडपातच हळद लावण्यात आली.

दुसरीकडे, महावितरणने उपोषणकर्त्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या धोरणानुसार मुख्य अभियंत्यांनी वर्कर्स फेडरेशनच्या ७ सदस्यांची पदस्थापना ही यवतमाळ कार्यालयात जास्त जागा रिक्त असल्याने त्या ठिकाणी केली होती. या पदस्थापनेच्या विरोधात बेमुदत  उपोषण सुरू  करण्यात आले आहे. त्यानंतर  संघटना व महावितरणमध्ये झालेल्या  चर्चेनंतर मुख्य अभियंत्यांनी संघटनेच्या ७ पैकी ५ सदस्यांची बदली ही संघटनेच्या मागणीनुसार अमरावती मंडल कार्यालयात  केली . यावर संघटनेने सकारात्मक प्रतिसाद घेत आपले उपोषण मागे घेणे गरजेचे होते. पण संघटनेने उर्वरित २ सदस्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा करीत बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे. सोबत  प्रशासनाची बदनामी करण्याचे सत्र सुरू केले आहे. या लग्नसोहळ्यासाठी उपहासात्मक निमंत्रण पत्रिका छापून लोकप्रतिनिधी तसेच अनेक अधिकाऱ्यांनाही या सोहळ्यास निमंत्रित करून महावितरणची जनसामान्यांतली प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

वर्कर्स फेडरेशनच्या भूमिकेकडे लक्ष

बदली किंवा पदस्थापना ही कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार नाही तर प्रशासनाच्या धोरण, गरज व ग्राहकांच्या सोयीनुसार  करावी लागत असल्याने  वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनापुढे महावितरण प्रशासनानेही  न झुकण्याचा निर्णय  घेतला आहे. मुख्य कार्यालयानेही या आंदोलनाची गंभीर दखल घेत महावितरणच्या सेवाशर्तीनुसार उपोषणात वापरलेल्या प्रत्येक बाबीची  गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. आता वर्कर्स फेडरेशन काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.