टिकटॉक अ‍ॅपसाठी व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्याचा छंद लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना लागला आहे. काही सरकारी कर्मचारीही त्याच्या आहारी गेले असून बोईसर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी कामापेक्षा ‘टिकटॉक’वर जास्त वेळ घालवत असल्याचे समाजमाध्यमावर प्रदर्शित झालेल्या एका व्हिडिओतून उघड झाले आहे.

सतत कोणत्या ना कोणत्या प्रकाराने बोईसर ग्रामपंचायत चर्चेचा विषय झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने चक्क ग्रामपंचायत कार्यालयात मद्य प्राशन केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच ग्रामपंचायतीचे एक महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचाऱ्याने तयार केलेल्या  ‘टिकटॉक’ व्हिडिओचा विषय चर्चेला आला आहे.

बोईसर ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांना आपली कामे करण्यासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. येथील कर्मचारी अधिकाऱ्यांपेक्षा वरचढ असल्याचे नागरिकांकडून अनेकदा आरोप होत होते. मात्र समाजमाध्यमावर टिकटॉक व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे पितळ उघडे झाले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात कर्मचारी संख्या असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीमध्ये काही कर्मचारी फक्त राजकीय आशीर्वादामुळे आरामदायी काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कामापेक्षा अधिक कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांना आपला वेळच समाजमाध्यमावर घालवावा लागतो हे समोर आले असून ग्रामपंचायत कार्यालयात आपली कामे न करता फक्त टिकटॉक व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कार्यालयातील ‘टिकटॉक’

टिकटॉक व्हिडिओमध्ये पुरुष कर्मचारी बोलतो ‘साडेपाच वाजले ऑफिसची वेळ संपत आली तुझ्या साहेबांना कळत नाही काय, ऑफिस सुटण्याच्या वेळी कसली कामे सूचत असतात. दिवसभर काय झोपा काढतात काय.. मला हे अजिबात आवडत नाही. यावर महिला कर्मचारी बोलते, ‘थांब, मी साहेबांना सांगते.’ तेवढय़ात पुरुष कर्मचारी महिलेचा हात पकडून त्यांना थांबवतो. अशा प्रकारचा व्हिडिओ  समाजमाध्यमावर टाकल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजाचे वाभाडे निघाले आहेत.

दोन्ही कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे. यापुढे असे कोणतेही प्रकार ग्रामपंचायत कार्यालयात घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

– कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी बोईसर