News Flash

सुडापोटी मालकाच्या चिमुकल्याची हत्या

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून नागपूरमधील दंतवैद्यक मुकेश चांडक यांच्या युग नावाच्या आठ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

| September 4, 2014 04:48 am

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून नागपूरमधील दंतवैद्यक मुकेश चांडक यांच्या युग नावाच्या आठ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. युग याचे सोमवारी सायंकाळी अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी चांडक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या राजेश ऊर्फ राजू डवारे याला आणखी एका साथीदारासह अटक करण्यात आली आहे.
नागपूर शहरातील पूर्वेकडील छाप्रूनगरातील गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये राहणारे चांडक यांचा मुलगा युग सोमवारी सायंकाळी शाळेतून घरी आला. अपार्टमेंटच्या रखवालदाराच्या खुर्चीत दफ्तर फेकून ‘आत्ता येतो’ असे म्हणत पळालादेखील. तो धावत रस्त्यापलीकडे गेला. तेथे लाल टी-शर्ट घातलेल्या स्कुटीचालकाने त्याला बसवले, तो गेला तो अखेरचाच. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचे वृत्त मंगळवारी रात्री आले आणि चांडक कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. याप्रकरणी पोलिसांनी राजेश आणि अभिलाषसिंह या दोघांना अटक केली. यापैकी राजेश हा चांडक यांच्याकडे पूर्वी काम करत होता. मात्र, त्याला कामावरून काढण्यात आले. त्याचा सूड म्हणूनच त्याने युगची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
नागपूरकरांचा संताप
खंडणीसाठी सात निष्पाप बालकांचा बळी जाण्याची शहरातील ही सातवी घटना आहे. त्यामुळे नागरिक संतप्त असताना निष्पाप युग चांडकचे अपहरण व खून झाल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. मंगळवारी मध्यरात्री मेयो रुग्णालयात युगचे पार्थिव आणण्यात आल्याचे समजताच तेथे नागरिकांची गर्दी झाली. रुग्णालय परिसर असल्याने पोलिसांनी सूचना देऊनही जमाव न हटल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा जमाव लकडगंज पोलीस ठाण्यापुढे आला. आरोपींना ताब्यात देण्याची मागणी करू लागला. त्यासाठी रस्त्यावर टायरची जाळपोळ सुरू झाली. कुणी तरी दगड भिरकावल्याने पोलिसांनी लाठीमार केला. नंतर जमाव चांडक यांच्या इमारतीपुढे गोळा झाला. तेथेही पोलिसांनी लाठीमार केला.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:48 am

Web Title: employers son killed in revenge in nagpur
Next Stories
1 सेना तालुकाप्रमुखाची चोरटय़ांकडून हत्या
2 नक्षलवाद्यांची तेलंगणात विलिनीकरण दशकपूर्ती
3 भूजल गुणवत्ता देखरेख केंद्रांची कमतरता