24 January 2019

News Flash

‘डायमंड कटिंग’च्या माध्यमातून रोजगार – मुनगंटीवार

बल्लारपूर येथील डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात मुनगंटीवार बोलत होते.

केंद्राचे उद्घाटन करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व अन्य.

चंद्रपूर जिल्हय़ातील तरुणांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे ही प्राथमिकता आहे. त्या दृष्टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करत आहोत. बल्लारपुरात डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला प्रशिक्षणार्थ्यांला २० हजारावर रोजगार देणाऱ्या व तीन वर्षांत तीन  हजार तरुण या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा मानस आहे. प्रतिवर्षी एक हजार तरुण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील. याआधीही पोंभुर्णा आणि आगरझरी या ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरू केला आहे. तैवान सरकारच्या सहकार्याने टूथपिक निर्मितीचा कारखाना तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या जिल्हय़ाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा या जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बल्लारपूर येथील डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात मुनगंटीवार बोलत होते. तरुणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानाला सुरुवात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजागाराभिमुख आहे. याचे कौतुक नीती आयोगाने केले आहे. राजुरा येथे विमानतळ विकासासाठी १२०० एकर जागा उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. हिंगणघाटचे मोहता यांच्या मदतीने बल्लारपूर येथे महिलांना कापडनिर्मिती करण्याचे प्रशिक्षण व रोजगार देण्याचा करार केला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवचंद द्विवेदी, येरमे, रेणुका दुधे, नीलेश गुल्हाने आदींची उपस्थिती होती.

गुल्हाने म्हणाले, डायमंड उद्योगामध्ये मी गेले १५ वर्षे काम करत आहे. डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची तीव्र इच्छा होती. सुरत, मुंबईत हिऱ्यांचे व्यापारी मोठय़ा संख्येने आहेत. मात्र, त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाहीत. रोजगारांची १०० टक्के हमी असून किमान २० हजार रुपये रोजगार मिळू शकतो. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पाठिंब्यामुळे व सहकार्याने हे केंद्र उभे राहू शकले. राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत या केंद्राचे उद्घाटन आकाश लिडबे, स्वप्निल पेंढारकर, सचिन वासेकर, विक्की उडाणे या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. हे डायमंड प्रशिक्षण केंद्र हे दादाभाई नौरोजी वार्डातील दादाभाई पॉटरीज येथे आहे. याप्रसंगी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांचेही भाषण झाले. संचालन काशिनाथ सिंह यांनी केले, तर आभार स्वप्ना पंचलवार यांनी मानले.

डायमंड कटिंग आणि प्रोसेसिंग डायमंड कटिंग आणि प्रोसेसिंग याबाबतचे रहिवासी प्रशिक्षण चार महिन्यात देण्यात येणार आहे. या दरम्यान भोजन व निवास व्यवस्था नि:शुल्क आहे. एन.डी. जेम्स ही कंपनी मुलांना हिऱ्यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरत व मुंबई येथे रोजगाराची हमी सुद्धा देणार आहे. पुढील तीन वर्षांत तीन हजार मुलांना प्रशिक्षण व रोजगार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्यात अशाप्रकारे हमी देऊन प्रशिक्षण देणारा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून उमेदवार पाठवण्यात येते. या प्रशिक्षणाच्या निवडीसाठी सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा कौशल्य विकास विभागांशी संपर्क साधावा.

 

 

First Published on February 12, 2018 2:20 am

Web Title: employment through diamond cutting says sudhir mungantiwar