आदिवासी महिलांच्या मालकीची राज्यातील पहिली संस्था

आदिवासी महिलांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवत चंद्रपूर जिल्हय़ातील पोंभुर्णा तालुक्यात पोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोडय़ुसर्स कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. अशा पद्धतीची कुक्कुटपालन करणारी आदिवासी महिलांच्या मालकीची ही राज्यातील पहिलीच कंपनी आहे. आज या कंपनीत पहिल्या टप्प्यात ३४५ आदिवासी महिला सक्रिय असून भविष्यात एक हजार महिलांची कंपनी होणार आहे. या व्यवसायातून या कंपनीची एक महिला महिन्याकाठी २५ ते ४० हजाराचे उत्पन्न घेणार आहे.

अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तथा टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मूल, पोंभूर्णा व गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये एक हजार आदिवासी महिलांनी कुक्कुटपालन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पोंभूर्णा तालुक्यातील ३४५ महिलांना कुक्कुट शेड उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एका महिलेला ५०० स्वे. फुटाचे एक शेड दिले आहे. या एका शेडमध्ये ५०० कोंबडीची पिल्ले दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे एका वर्षांत सहा वेळा ब्रॉयलर कोंबडय़ांची विक्री या कंपनीच्या माध्यमातून करता येणार आहे. यातून कंपनीतील प्रत्येक महिलेला २५ ते ४० हजाराचे उत्पन्न एका महिन्याला होणार आहे. तसेच आर्थिक वर्षांच्या अखेर बोनससुद्धा दिला जाणार आहे. सुरुवातीच्या काळात एका आठवडय़ात ब्रॉयलर कोंबडीची पिल्ले दिली जाणार आहेत. मात्र काम सुरळीत झाल्यानंतर तीन ते चार दिवसाच्या अंतराने ८ ते १० हजार ब्रॉयलर पिल्ले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या आदिवासी महिलांची कंपनी १४ मार्च रोजी स्थापन झाली. त्यानंतर लगेच १६ मार्चला कंपनीची पहिली बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत झाली. या कंपनीच्या अध्यक्ष म्हणून भटारी या गावातील यमुना राजेंद्र जुमनाके ही आदिवासी महिला आहे. तर हा प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक गावातील एक महिला तथा गाव प्रतिनिधी या कंपनीची संचालिका आहे. महिन्यातून एकदा संचालक मंडळाची बैठक होते. त्या बैठकीत कंपनीच्या कार्याबद्दलची दिशा ठरविण्यात येते.  आदिवासी बहुल पोंभूर्णा तालुक्यात महिलांना आत्मनिर्भर करत रोजगार देणारा हा प्रकल्प निश्चितच राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

आदिवासी महिलांच्या हक्काची राज्यातील पहिली कंपनी असून हा प्रकल्पच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याने या संदर्भात जिल्हा प्रशासन पूर्णपणे या प्रकल्पाच्या पाठीशी आहे.

आशुतोष सलिल, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

राज्य शासनाने या कंपनीला १२.५० कोटी व टाटा ट्रस्टने ३ कोटी असे एकूण १५.५० कोटीचा निधी दिला आहे. यात एका महिलेला कुक्कुटपालन शेडच्या बांधकामासाठी १ लाख रुपये दिले गेले आहेत. औषध व इतर बाबींसाठी प्रति महिला ३० हजार रुपये याप्रमाणे कंपनीला दिले आहेत. तर कर्मचारी व इतर खर्चासाठी २० हजार रुपये दिले आहेत. या कंपनीत सध्या ४ कर्मचारी प्रकल्पात व ७ कर्मचारी कंपनीत असे एकूण ११ कर्मचारी कार्यरत आहेत. भविष्यात कंपनीचा व्यापार मोठा झाल्यानंतर आणखी कर्मचारी नियुक्त केले जातील.

असीत मोहन, व्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक

आदिवासी महिलांना या प्रकल्पामुळे रोजगाराची नवी दिशा व संधी प्राप्त झाली आहे. यामुळे महिला स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून तीन हजार महिलांना यामुळे रोजगार मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रकल्पाचे खरे शिल्पकार आहे. त्यांच्यामुळेच गावातील महिलांनी समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. भविष्यात हा व्यवसाय भरभराटीला येईल या दिशेने आम्ही महिला एकजुटीने काम करीत आहोत.

यमुना राजेंद्र जुमनाके, अध्यक्ष, पोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोडय़ुसर्स कंपनी लिमिटेड