३२ गावांना पुराचा फटका : ६५० जनावरांचा मृत्यू, शेकडो घरांचेही नुकसान

जळगाव : पावसाअभावी दरवर्षी टंचाईच्या सावटाखाली राहिलेल्या चाळीसगाव तालुक्याने मंगळवारी पावसाचे रौद्ररूप अनुभवले. तब्बल ३२ गावांना पुराचा फटका बसला असून, लहान-मोठ्या ६६१ जनावरांचा मृत्यू झाला. तितूर आणि डोंगरी या नद्यांच्या पात्रात वाढलेले अतिक्रमण, सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेली बांधकामे, अवैधरीत्या होणारा वाळू उपसा, नालेसफाईकडे दुर्लक्ष आदी कारणांनी चाळीसगाव शहरातील वस्त्या, बाजारपेठा जलमय झाल्या.

चाळीसगावमध्ये अतिवृष्टीने एकाचा मृत्यू झाला. पुरामुळे ३०० दुकाने, ६१७ घरांचे अंशत: तर २० घरांचे पूर्णत: नुकसान झाले. शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले असे तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगितले.

पावसाने थैमान घातले असताना दरड कोसळल्यामुळे कन्नड घाटात वाहने अडकू न पडली.  तितूर आणि डोंगरी या दोन्ही नद्यांचा संगम चाळीसगाव शहराजवळ होतो. पुराची तीव्रता वाढण्यास नदीपात्रांतील अतिक्रमणांनी हातभार लावला. सुशोभीकरणाच्या नावाखाली कामे करताना विचार झाला नाही. लोकप्रतिनिधींनी शैक्षणिक संस्थाही त्यास अपवाद राहिल्या नाहीत. दोन्ही नद्यांमध्ये शहरातील सांडपाणी आणि कारखान्याचे रसायनयुक्त पाणी सोडले जाते. पावसाळ्याआधी नद्यांची साफसफाई आणि खोलीकरण झाले नाही. त्यामुळे शहरातील वस्त्या, बाजारपेठांमध्ये पाणी शिरले. पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर नुकसान टाळता आले असते, असे पूरग्रस्त भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. नदीपात्रातील अतिक्रमणांचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.