News Flash

३५ वर्षांपूर्वीचे सूर्या कालवे कालबाह्य़?

पाणी पोहोचविण्याची योजना प्रस्तावित; सूर्या कालव्यांशेजारील अतिक्रमणाकडे डोळेझाक

पाणी पोहोचविण्याची योजना प्रस्तावित; सूर्या कालव्यांशेजारील अतिक्रमणाकडे डोळेझाक

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले सूर्या उजवा आणि डावे तीर कालवे जीर्ण झाल्याने कालव्यांची क्षमता क्षीण झाली आहे. परिणामी कालव्यांची दुरवस्था झाली आहे. पूर्वी या कालव्यांची देखभाल-दुरुस्तीसाठी एजन्सी नेमण्यात येत होत्या. मात्र त्यांच्या सदोष गुणवत्तेमुळे हे ठेके बंद केले. मात्र कालव्यांची दुरवस्था सुधारलेली नाही. कालवे दुरुस्तीसाठी प्रभावी कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.

आदिवासी उपाययोजनेंतर्गत तलासरी, विक्रमगड, पालघर आणि डहाणू या चार आदिवासी तालुक्यांसाठी सूर्या प्रकल्पासाठी  ४५० कोटी रुपये खर्च करून धामणी आणि कवडास ही धरणे बांधून सूर्या डावा आणि उजवा तीर कालवे काढण्यात आले. डहाणू, पालघर तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र आहे. सूर्या सिंचन क्षेत्रात १०० हून अधिक अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र त्यावरही कारवाई झालेली नाही. सिंचन क्षेत्राशेजारील बांधकामांना सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंता यांचा ना-हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. मात्र ना-हरकत दाखला न घेताच बांधकामे केली जात असल्याचे चित्र आहे.

सूर्या कालवे असणाऱ्या परिसरात ३००० एमएम पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि पाटामध्ये वारंवार गाळ-कचरा साचण्याच्या प्रकारामुळे पाट फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. या कालव्यांना सतत कोठे ना कोठे भगदाड पडत आहे. ते बुजवण्याचे काम पाटबंधारे खात्याचे आहे. मात्र खात्याकडून कामे होत नाहीत. सध्या पाटामध्ये झाडीझुडपे वाढल्याचे चित्र आहे. पूर्वी या कालव्यांची देखभाल-दुरुस्तीसाठी एजन्सी नेमण्यात येत होत्या. मात्र त्यांच्या सदोष गुणवत्तेमुळे हे ठेके बंद केले. मात्र कालव्यांची दुरवस्था सुधारलेली नाही.

धामणी धरणाला जोडून डहाणू व पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता डावा व उजवा असे दक्षिणोत्तर पाट बांधण्यात आले. शासनाने धामणी व कवडास येथील दोन धरणे बांधली; परंतु ३० वर्षांपूर्वीचे कालव्यांचे बांधकाम आणि त्याच्या देखभाल व दुरुस्तीअभावी गळतीचे प्रमाण वाढल्याने आणि कालव्यांना अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने या भागातील शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

कालव्यातून पाइपने पाणी पोहोचवण्याची योजना प्रस्तावित आहे. अतिक्रमणधारकांना नोटिसा अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– रवी पवार, कार्यकारी अभियंता, सूर्या प्रकल्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:42 am

Web Title: encroachment near surya canals zws 70
Next Stories
1 करोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता
2 नगरमध्ये जनता संचारबंदीच्या निर्णयास राजकीय वादाचा संसर्ग
3 सांगलीत काँग्रेस विरुद्ध जयंत पाटील
Just Now!
X