साडेतीन मुहूर्तापकी एक असलेला दसरा सण जिल्ह्य़ात उत्साहात साजरा झाला. गेले नऊ दिवस सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीने सांगता झाली. ठिकठिकाणी बसविण्यात आलेले घट व देवींच्या मूर्तीचे गुरुवारी मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. गुरुवारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोनेखरेदीसाठी झुंबड उडाली होती.

दसऱ्यानिमित्त घराघरांत उत्साहाचे वातावरण होते. घरोघरी पूजाअर्चा, शस्त्रास्त्र पूजन झाले. व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानातील वजनमापे व अन्य साहित्याची पूजा केली. दसऱ्यानिमित्त दुपारच्या जेवणात श्रीखंडाचा बेत होता. अनेक दुकानांतील श्रीखंड संपले. एकटय़ा अलिबाग तालुक्यात साडेपाच हजार किलो श्रीखंडाची विक्री झाल्याची माहिती मधुलक्ष्मी डेअरीचे आठवले यांनी दिली.
दसऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्य़ात लाखो रुपयांची उलाढाल झाली. नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले. शिवाय मोटारसायकल, टी. व्ही., फ्रिज, मोबाइल, वॉिशग मशीन अशा नित्योपयोगी वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाली.
सायंकाळी ठिकठिकाणी देवींच्या मूर्ती व घटांची मिरवणूक निघाली. वाद्यांच्या तालावर आणि जय अंबे जय भवानीच्या गजरात तरुण-तरुणींनी मिरवणुकीत ताल धरला. काही मिरवणुकांमध्ये गरबा-दांडियाही रंगला. जिल्ह्य़ात ५५३ सार्वजनिक, तर ११० खासगी देवींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. ठिकठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम झाले. यंदा पाऊस कमी झाला असला तरी भाताचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दसऱ्याच्या सणातही उत्साह होता. शाळांमध्ये सरस्वती पूजनाने शारदोत्सवाची सांगता झाली. सायंकाळी सर्वत्र सीमोल्लंघन झाले. सोन्याचे प्रतीक म्हणून आपटय़ाची पाने लुटत सर्वानी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.