कोल्हापूर : वीज वापरानुसार ३ महिन्याची विभागणी करून वीज देयके दुरूस्त करण्याचे आश्वासन उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. याबाबत लवकरच परिपत्रक जाहीर करणार असल्याचेही त्यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळास सांगितले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग, व्यापार विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष मालपाणी यांनी गुरुवारी सांगितले.

राज्यातील ग्राहकांना टाळेबंदी कालावधीतील ३ महिन्यांचे एकत्रित वीज बील देऊन महावितरण कंपनी ग्राहकांची फसवणूक आणि लूट करत आहे. त्यामुळे वीज दरवाढ मागे घ्यावी, वीज देयकांची चार भागात विभागणी करून नव्याने देयक द्यावे या मागणीसाठी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, सुभाष मालपाणी, प्रकाश पाटील, माणिकराव पाटील, मुकुंद खटावकर, सलीम ढालाईत यांनी उर्जामंत्री राऊत यांची मुंबई येथे भेट घेवून सविस्तर चर्चा केली. चर्चेवेळी महावितरण वाणिज्य विभागाचे संचालक सतीश चव्हाण हे उपस्थित होते.

शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन मंत्री राऊत यांनी टाळेबंदी कालावधीतील ३ महिन्यांचे एकत्रित घेतलेल्या ‘रिडींग’ची विभागणी करून प्रति महा वीज वापरानुसार देयके दुरुस्त करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ३ कोटी वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वीज देयाकासंदर्भात तक्रार असेल त्यांनी महावितरण कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.