घरातील गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून येथील उद्योजकाच्या तरुण अभियंता मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री गंगापूर रस्त्यावरील दादाजी कोंडदेवनगर येथे घडली. आत्महत्येसाठी या युवकाने अवलंबिलेल्या मार्गाने सारे चक्रावले आहेत.

अजिंक्य उदय खरोटे (२५) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. वाय. बुराडे यांनी दिली. शुक्रवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी अजिंक्यचे वडील उदय खरोटे आणि आई काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणी नसताना अजिंक्यने स्वयंपाक घरातील शेगडीपासून गॅसची नळी वेगळी केली. सिलिंडरचे ‘रेग्युलेटर’ सुरू करीत नळी तोंडात धरीत त्याने आत्महत्या केली. या कालावधीत आई-वडील अजिंक्यशी भ्रमणध्वनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने ते घरी परतल्यावर हा प्रकार उघड झाला. कुटुंबियांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एलपीजी गॅस शरीरात मिसळल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचा प्राथामिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गॅसची नळी तोंडात धरून आत्महत्येचा मार्ग त्याने कसा शोधला, याची छाननी पोलीस यंत्रणा करीत आहे. इंटरनेटवरून त्याने काही माहिती मिळवली का, याचाही तपास केला जात आहे. अजिंक्यने सौमय्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. वडिलांसोबत तो कारखान्याचे काम पहात होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.