राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनंत करमुसे असं या स्थापत्य अभियंत्याचं नाव असून आव्हाड यांच्या पोलीस शरीररक्षकांसह काही जणांनी त्यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप त्यानं केला आहे. याबाबत वर्तकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशवासीयांना दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर अनंत करमुसे यानं त्यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याच रात्री दोन गणवेशधारी आणि दोन विना गणवेशातील पोलिसांनी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. दरम्यान, त्यानं प्रश्न विचारला असता त्याला आव्हाडांच्या बंगल्यावर नेत असल्याचं सांगण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करायला लावली. त्यानंतर माफीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती त्यानं दिली. यानंतर त्यानं वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

यावर भाजपाच्या काही नेत्यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. “ठाण्यातील या विलक्षण संताप जनक प्रकाराबद्दल ठाणे पोलिस आयुक्तांशी दिल्लीहून फोन वर बोललो. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले आहेच, पण गंभीर मुद्दा कायद्याच्या रक्षकांनी कायदा हातात घेण्याचा आहे. हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमाने साकारलेल्या संविधानाचा अपमान आहे, असं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केलं.

आव्हाडांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा – फडणवीस
एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. अशी मागमी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

आव्हाडांपासून वाचवा – डावखरे
कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा. कमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण झाली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई’ आहे की `शिवशाही असा सवाल भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer person brutally beaten by minister jintendra awhad workers police after facebook post jud
First published on: 07-04-2020 at 20:16 IST