श्रीरामपूर : टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील राहुल नानासाहेब पवार (वय २७) या आयटी इंजिनिअरने बंदुकीतून स्वत:वर गोळ्या झाडून घेऊ न आत्महत्या केली. पब्जी गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केला असून नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचा राहुल हा मुलगा आहे. त्याचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अभियंता झाल्यानंतर त्याने नोकरी केली नाही. तसेच त्याला शेतीतही रस नव्हता. मात्र पोल्ट्री व्यवसाय टाकण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्या होत्या. त्याच्यामागे एक भाऊ, आई, वडील, पत्नी, बहिणी असा  परिवार आहे.

नेवासे रस्त्यालगत टाकळीभान गावात पवार यांची इमारत आहे. काल राहुल हा रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर गप्पा मारत बसला होता. त्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान तो खोलीत झोपण्यासाठी गेला. त्याची पत्नी आषाढ महिना असल्याने दोन दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती. राहुल हा खोलीत एकटाच होता. आत्महत्येपूर्वी त्याने रात्री एक वाजेपर्यंत मित्रांना मोबाइलवरून मेसेज केले. मला माफ करा, असा त्यात मजकूर होता. त्याचे मेव्हणे बाळासाहेब तुवर हे गावातच राहतात. त्यांना राहुल याने त्यांना मोबाइलवर मेसेज पाठवला, त्यात ‘मला नैराश्य आले आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे,’ असा मजकूर राहुलने लिहिला.त्यानंतर खोलीत स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.

आज सकाळी तुवर यांनी मोबाइलवरील मेसेज पाहिल्यानंतर पवार यांच्या घरी धाव घेतली. तुवर व मयत राहुल यांचे मोठे बंधू भाऊ साहेब पवार यांनी दरवाजा वाजवला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता राहुलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. भाऊ साहेब पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. आज पवार याचे शवविच्छेदन लोणी येथील प्रवरा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात टाकळीभान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल याला पब्जी गेमचा गेल्या काही दिवसांपासून नाद लागला होता. तो दिवसरात्री मोबाइलमध्ये गेम खेळत असे. त्याला आईवडिलांनी तसेच मित्रांनी व गावातील कार्यकर्त्यांनी मोबाइलमधील गेम खेळणे बंद करण्याचा सल्ला दिला होता. तो मितभाषी होता. फारसा लोकांमध्ये मिसळत नव्हता. मोजक्याच मित्रांशीच त्याचा संवाद होता. पब्जी गेमने त्याचा बळी घेतल्याची गावात चर्चा आहे. मात्र पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी त्याचा इन्कार केला आहे. नैराश्यातून राहुलने आत्महत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राहुलने आत्महत्येपूर्वी पाठविलेला मेसेज

‘मी आज जे करत आहे, त्याला कोणाला जबाबदार धरू नये. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. माझी मानसिक स्थिती चांगली नसल्याने मी हा निर्णय घेत आहे. माझा निर्णय हा सर्वाना चूक वाटत असला, तरी मला मात्र योग्य वाटतो. आयुष्यात जगण्याची आशा मला राहिलेली नाही. जगण्यासाठी डिप्रेशनमधून बाहेर निघण्यास मी हतबल आहे. त्यामुळे मी मानसिक स्थितीला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आईला सांभाळा. तिची काळजी घ्या.’असा राहुल याने मृत्यूपूर्वी मेव्हणे तुवर यांना मोबाइलवर निरोप पाठविला आहे.