चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधील गाळय़ांचे दर औद्योगिक विकास महामंडळाने सहापटींनी वाढविल्याने उद्योजक अभियंते हैराण झाले आहेत. पूर्वी हे दर ७ रुपये चौरस फूट होते, ते आता ४६ रुपये करण्यात आले आहेत. परिणामी, मराठवाडय़ात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कसेबसे तग धरून असणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न घेऊन लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
केवळ दरवाढच नाही, तर जागेच्या किमतीतही तब्बल ३०० टक्के वाढ झाली. दीर्घमुदतीच्या करारावर जागा देताना प्रतिचौरस फूट ८०० रुपयांचा दर २ हजार ४००पर्यंत वाढविण्यात आला. औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी सुविधा तर काहीच देत नाहीत. वरून होणारी दरवाढ न परवडणारी असल्याचे उद्योजक प्रताप धोपटे यांनी सांगितले. मराठवाडय़ात पाण्याची कमतरता असल्यामुळे माहिती-तंत्रज्ञानावरील उद्योग अधिक यावेत, यासाठी शहरातील चिकलठाणा भागात तंत्रज्ञान पार्क उभारण्यात आले. या पार्कमध्ये सध्या सात-आठ कंपन्या सुरू आहेत.
नोव्हेंबर २०११मध्ये तंत्रज्ञान पार्कच्या इमारतीचा बाहय़भाग आकर्षक करण्याचे ठरविण्यात आले. वास्तविक, त्याची काही गरज नव्हती, असे उद्योजकांना वाटते. सुविधा न देता बाहय़रंग बदलण्याचा हा उद्योग करू नका, असा आक्षेपही घेण्यात आला होता. तथापि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘अच्छे दिन येतील’ असे सांगत राज्यात सत्तेवर आल्यानंतर फडणवीस सरकारने इमारतीतील गाळय़ांचे दर वाढविण्याचा निर्णय गेल्या १ जानेवारीला घेतला. तो त्याच महिन्यापासून लागू करण्यात आल्याने या क्षेत्रातील उद्योजकांना वाढीव किराया भरण्याचे आदेश काढण्यात आले. तत्पूर्वी साधी नोटीसही बजावली नाही.
अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे अनेकांचे अर्थकारणच कोलमडले आहे. विनोद राठी या तरुण उद्योजकाने आपल्या कंपनीचे कार्यालयच येथून हलविले. अन्य उद्योजकही हैराण आहेत. ही भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे केदार पानसे, संदीप पाठक, स्वप्नील महाजन, पुनीत धिंग्रा, अभिजित मोदी या उद्योजकांनी म्हटले आहे. या कंपन्यांमध्ये २००पेक्षा अधिक अभियंते काम करीत आहेत. झालेली भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी भाजपचे आमदार अतुल सावे प्रयत्न करीत आहेत. ते या उद्योजकांसह मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत.