‘आजचा तरुण अनेक बाबतीत गंभीर नाही’, हा एका ठरावीक पिढीचा समज किती चुकीचा आहे, याचे प्रत्यंतर देत लोकसत्ताच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी येथे पार पडली. जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय अस्मितेच्या मुद्दय़ाला प्राधान्य देणाऱ्या या विद्यार्थ्यांनी या विषयाबाबत वाचन करून, अभ्यास करून आपली मते आपल्या भाषणातून मांडली. दरम्यान, औरंगाबाद विभागाच्या प्राथमिक फेरीस सोमवारी प्रारंभ झाला. मराठवाडा व खान्देशातील २८ स्पर्धकांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली.
नाथे समुह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने, तसेच जनकल्याण सहकारी बँकेच्या मदतीने यंदा प्रथमच राज्यातील आठ विभागीय केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे. त्यापैकी रत्नागिरी विभागीय केंद्राची प्राथमिक फेरी सोमवारी पूर्ण झाली. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, बेळगाव इत्यादी ठिकाणच्या २३ महाविद्यालयांमधील २९ स्पर्धकांनी त्यामध्ये भाग घेतला. त्यातून आठ विद्यार्थी-स्पर्धकांची अंतिम विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली.
या स्पध्रेसाठी सामाजिक चळवळींपासून मनोरंजन क्षेत्रापर्यंतचे पाच विषय देण्यात आले होते. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थी स्पर्धकाने भाषण
करणे अपेक्षित होते. सोमवारी रत्नागिरी येथे झालेल्या प्राथमिक फेरीत जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी ‘जागतिकीकरणामध्ये

देश संकल्पना किती सुसंगत?’ या विषयावर भाषणे करून सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या दृष्टीने तो सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा असल्याचे दाखवून दिले. तसेच जागतिकीकरणाच्या रेटय़ात देशाची अस्मिता जपणे जास्तच गरजेचे झाले असल्याची भावना बहुतेकांनी नोंदवली.
या प्राथमिक फेरीसाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस आणि फाटक हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर यांनी काम पाहिले. या फेरीत निवडण्यात आलेल्या आठ विद्यार्थ्यांची विभागीय अंतिम फेरी ३१ जानेवारी रोजी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.
केंद्रीय अंतिम फेरीत निवड झालेले स्पर्धक
आदित्य कुलकर्णी (डीबीजे कॉलेज, चिपळूण), हर्षद तुळपुळे (गोगटे-जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), प्रवीणा यल्लूरकर (आर.एल.सायन्स इन्स्टिटय़ूट, बेळगाव), प्रतिक्षा पाटील (डॉ. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, बेळगाव), श्रिया पटवर्धन (घरडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल-खेड), चिन्मयी मटांगे (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), अद्वैत घवाळे (संत राऊळमहाराज महाविद्यालय, कुडाळ) आणि प्रणव माळी (आर.सी.काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे परशुराम, चिपळूण)
आर्ट सर्कलतर्फे सीडी
महाविद्यालयीन जगतात वक्तृत्व कलेची जोपासना जास्त सशक्तपणे करण्यासाठी लोकसत्ताने आयोजित केलेल्या या उपक्रमाला रत्नागिरीच्या आर्ट सर्कलचे संस्थापक-सदस्य नितीन कानविंदे यांनी दाद देत स्पध्रेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘मराठी अभिमान गीत’ ही सीडी सप्रेम भेट दिली. त्यामध्ये ‘लाभले आम्हास भाग्य. . .’ (कै. सुरेश भट), ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा.’ (कै. कुसुमाग्रज) आणि  ‘माझ्या मराठीचा बोल, वाजे काळजात खोल’ (अशोक बागवे) या गीतांची सीडी सप्रेम भेट दिली. प्रतिभावान संगीतकार कौशल इनामदार यांनी या गीतांना संगीतसाज चढवला असून निर्मितीही त्यांचीच आहे.
शीघ्र कवीचीही स्पध्रेला काव्यमय दाद
आट सर्कलप्रमाणेच येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयातील उमेश पंडित यांनी स्पर्धा चालू असतानाच कविता रचून या उपक्रमाला दाद दिली. त्यापैकी काही ओळी पुढीलप्रमाणे- तंत्रज्ञानाने माणूस झाला आळशी
विचारांची देवाणघेवाण होत नाही फारशी
अशा या काळात ‘लोकसत्ता’ने घेतला वसा
आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेऊन उठवला ठसा
कवितेचा समारोप पंडितांनी स्पध्रेला आणि लोकसत्ताला शुभेच्छा देऊन केला आहे.

औरंगाबादमध्ये उत्साहात प्रारंभ
औरंगाबाद- ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या औरंगाबाद विभागाच्या प्राथमिक फेरीस सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी ९ वाजता परीक्षक प्रा. महेश अचिंतलवार व श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मराठवाडा व खान्देशातील २८ स्पर्धकांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. प्राथमिक फेरीत एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेतील सर्व विषयांवर स्पर्धकांनी विचार व्यक्त केले. परीक्षक अचिंतलवार यांनी स्पर्धेतील पारदर्शकतेसाठी कोणकोणती काळजी घेतली आहे, याची माहिती उपस्थित स्पर्धकांना दिली. प्रत्येक स्पर्धकासाठी सांकेतांक ठरविण्यात आला होता. भाषणास जाताना पुढील स्पर्धकाचा सांकेतांक सांगितला जात होता. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभव विश्वातील उदाहरणांसह विषयाची मांडणी केली. स्पर्धेतील विषयांमुळे नव्याने अभ्यास करावा लागला, अशी प्रतिक्रिया स्पर्धकांनी दिली. स्पर्धकांच्या भाषणातील आकडेवारींचा स्रोतही परीक्षकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांची या वेळी उपस्थिती होती.