15 July 2020

News Flash

भूमाफियांकडून वनईमधील टेकडीचे सपाटीकरण

प्रशासकीय यंत्रणा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व्यस्त

प्रशासकीय यंत्रणा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व्यस्त; तहसीलदार अनभिज्ञ

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : टाळेबंदीच्या कालावधीत राष्ट्रीय प्रकल्प व रस्त्यांच्या कामांना आरंभ करण्याची अनुमती मिळायचा फायदा घेऊन डहाणू तालुक्यातील वनई येथील एक संपूर्ण टेकडीचे भू -माफियांकडून सपाटीकरण करण्यात आले आहे. या काळात महसूल विभाग करोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कार्यात व्यस्त राहिल्याने या प्रकाराकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याची माहिती डहाणू तहसीलदारांनादेखील नसल्याचे सांगण्यात येत आहे.

डहाणू तालुक्यात वनई चंद्रनगर ग्रामपंचायतीच्या लगतच्या डोंगराच्या भागात सुमारे आठ एकर भागात असलेला टेकडीचा २०० मीटर रुंद, १०० मीटर लांबी व तीस फूट खोली असलेल्या भागातून मुरूम व माती खोदकाम केल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे वनई पाटाच्या जवळपास तितक्याच आकाराच्या भागातूनदेखील अशाच प्रकारचे खोदकाम झाल्याची आढळून आले आहे.  त्याचप्रमाणे लगतच्या डोंगरांमध्ये इतर पाच-सहा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खोदकाम झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे एका महिन्याच्या कालावधीत टेकडीचे सपाटीकरण झाल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात ट्रक-डंपर वाहतूक होत असल्याने काही काळाने त्या गावापाडय़ातील रस्त्यांची दुर्दशा होत असे.  या मार्गावरून पावसाळ्यात वाहनाने प्रवास करणे जिकरीचे ठरणार आहे.  याबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले असता या प्रकरणी चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

उत्खननाच्या परवानाचा गैरवापर

डहाणू तालुक्यात द्रुतगती मालवाहू रेल्वे महामार्गाच्या भरावाचे काम सुरू आहे. त्याकरिता संबंधित व्यवस्थापनाने महसूल विभागाकडून गौण खनिज उत्खननासाठी परवानगी घेतली आहे. त्याचा आधार घेऊन काही भूमाफियांनी महसूल, वनविभागाची तसेच खासगी जमीन व कब्जा असलेल्या जमिनीतून मोठय़ा प्रमाणात खोदकाम केल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.  गेल्या महिन्याभरापासून दररोज सुमारे पाचशे गाडी भरून मुरू म मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक महसूल विभागाने सोयीस्कररीत्या कानाडोळा केल्याचे आरोप होत आहेत.

कोणतीही तक्रार नाही

यासंदर्भात डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांच्याशी संपर्क साधला असता वनई येथील झालेल्या टेकडीवरील माती उत्खननाविषयी आपल्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खोदकाम झालेले ठिकाण नेमके कोणाच्या मालकीचे आहे हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:31 am

Web Title: entire hill at vanai leveled by land mafias zws 70
Next Stories
1 शिमला मिरचीला ‘करोनाची बाधा’
2 वऱ्हाड निघालंय विलगीकरणाला!
3 ४४ वर्षे जुनी दुकाने जमीनदोस्त
Just Now!
X