‘आयसीएसआय’चा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला प्रस्ताव

पुणे : इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) कंपनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमासाठी आता प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्तेत वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा कल जोखण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे.

केंद्रीय वाणिज्य व्यवहार मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर ‘सीएस’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे ‘आयसीएसआय’चे अध्यक्ष रणजित पांडे यांनी सांगितले.

ललित कला अभ्यासक्रमाशिवाय कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सीएस अभ्यासक्रम करू शकतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रवेश परीक्षा सुरू करण्यात येत आहे. या बाबत दोन महिन्यांपूर्वी सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रवेश परीक्षेबाबतच्या या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पांडे यांनी सांगितले.

कंपनी सचिव अभ्यासक्रमांतर्गत सध्या फाउंडेशन परीक्षा, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्राम कोर्स चालविला जातो. त्यात एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे, प्रोफेशनल प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे, तर प्रोफेशनल प्रोग्राम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागते.

कौशल्य विकासासाठी..

‘सीएस’ अभ्यासक्रमात २०१७मध्ये बदल करण्यात आला. बदललेल्या अभ्यासक्रमाची परीक्षा नुकतीच झाली. आता पाच वर्षांनी २०२२मध्ये पुन्हा अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर देण्यात येत असून ई-लर्निग साहित्यही तयार करण्यात आले आहे. अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन आणि सूचना करण्यासाठी शैक्षणिक मंडळाची स्थापना करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवीन अभ्यासक्रम केंद्रे

संस्थेतर्फे देशभरात विविध ठिकाणी नवीन अभ्यास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. त्यात पुण्यातही पाच अभ्यास केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

अशी असेल प्रवेश परीक्षा : ‘आयसीएसआय’ने मंत्रालयाला पाठवलेल्या प्रस्तावानुसार फाउंडेशन परीक्षेच्या जागी प्रवेश परीक्षा घेतली जाईल. फाउंडेशन परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते. त्या ऐवजी होणारी ऑनलाइन प्रवेश परीक्षा कधीही देता येईल. या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांची कलचाचणी जाणून घेतली जाईल. परीक्षेत सामान्यज्ञान, इंग्रजी आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २४ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.