अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

परभणी : आज विदेशी गुंतवणुकीवरून व्यापारी रस्त्यावर उतरले असले तरी याच व्यापाऱ्यांनी भाजपला सत्तेत बसविण्याचे काम केले आहे, अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचितांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेची गुरुकिल्ली हाती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

लालसेनेच्या वतीने मातंग समाज सत्ता संपादन परिषद सोमवारी येथे आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झालेल्या जाहीर सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कॉ. गणपत भिसे होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपाच्या हाती सत्ता दिल्यास २०२२ मध्ये राज्यघटना संपुष्टात आणून स्वतची राज्य घटना निर्माण करायला हे शासन मागे पुढे पाहणार नाही. सनातनच्या अनेक लोकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळ शस्त्रे तसेच नकाशे सापडले आहेत. विशेष म्हणजे घाटकोपरसारख्या बहुसंख्य हिंदू समाज राहणाऱ्या भागात घातपात घडविण्याचा सनातनचा डाव होता हे उघड झाले असतानाही अद्याप संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचाही आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी सभेतून केला.

सर्वसामान्य माणसाने साधा चाकू बाळगला तर त्याच्यावर कारवाई होते. मोहन भागवत यांचे जे संघटन आहे त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्र असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. पोलिसांनी भागवत यांच्यावर कारवाई केल्यास आपण त्यांचा गौरव करू तसेच कारवाई करणाऱ्या पोलिसांना संरक्षणही देऊ असे प्रतिपादन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे, भगवान देवरे, लिंबाजी उजगरे आदी पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.

.. तर लोकसभेच्या सर्व जागा लढू

बहुजन वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत काँग्रेस सोबत झालेल्या बठकीनंतर राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांच्या हायकमांडकडून ग्रीन सिग्नलच मिळालेला नाही. त्यामुळे ही चर्चा अद्याप थांबलेलीच आहे. काँग्रेसने आघाडीला सोबत घेतले नाही तरी लोकसभेच्या राज्यातील सर्वच्या सर्व जागा बहुजन वंचित आघाडी लढवेल, अशी माहिती आंबेडकर यांनी पत्रकार बठकीत दिली.