ऑनलाइन बुकिंग केले तरच सुट्टीच्या दिवशी प्रवेश

विश्वास पवार, वाई : विविध रंगांच्या, नाना प्रकारांच्या, अनेक नावांच्या रानफुलांनी बहरलेले आणि जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेले कास पुष्पपठार सर्वानाच साद घालू लागले आहे.

सातारानजिकच्या कास पठाराच्या यंदाच्या पर्यटन हंगामाची सुरुवात सोमवारी करण्यात आली. कास पठारावर सुट्टीच्या दिवशी होणारी झुंबड टाळण्यासाठी पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. कास पठाराचे निसर्गसौंदर्य सर्व पर्यटकांना डोळ्यांत भरून घेता यावे, पर्यटकांची गर्दी उसळू नये याची दक्षता वन विभागाने घेतली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पुष्पपठाराचा आनंद घेता यावा यासाठी प्रदूषणविरहित बॅटरी रिक्षाची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. पठाराचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी प्रतिव्यक्ती शंभर रुपये आहे, तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी प्रतिविद्यार्थी २० रुपये आहे. ज्येष्ठ नागरिक आणि १२ वर्षांखालील मुलांना पठारावर मोफत प्रवेश आहे. पठारावर घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून पठारावर जाण्यासाठी प्रतिव्यक्ती १० रुपये शुल्क आकारून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पुष्पपठाराच्या http://www.kas.ind.in या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या पर्यटकानांच प्रवेश दिला जाणार आहे. इतर दिवशी प्रवेशद्वारावर बुकिंग करून पठारावर जाता येईल. सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ नोंदणी करूनच पठारावर यावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. या वर्षीच्या हंगामाचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.