News Flash

डहाणू पर्यावरण देखरेख समितीच्या विरोधातील ताकद निकामी

डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापनेनंतर  पावणेदोन वर्षांनी या समितीची फेररचना करण्यात आली.

संग्रहित

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापनेनंतर  पावणेदोन वर्षांनी या समितीची फेररचना करण्यात आली. नागरी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे या समितीचे अध्यक्ष पद सोपविण्यात आले असून शासकीय अधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असल्याने आधीच्या तुलनेत ही समिती प्रभावीहीन ठरल्याची जोरदार टीका स्थानिक प्रकल्पविरोधी कार्यकर्त्यांनी केली आहे.

केंद्रीय वने आणि पर्यावरण विभागाने १९ डिसेंबर १९९६ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार डहाणू आणि परिसरातील १५ किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय दृष्टिकोनातून  संवेदनशील घोषित करण्यात आले.  १८ नोव्हेंबर २००२ मध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने या अध्यादेशात सुधारणा करून डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन केले होते. या समितीमार्फत संपूर्ण परिसरात होणाऱ्या उपक्रमाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. या प्राधिकरणाचे समितीचे अध्यक्षपद स्थापनेपासून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याकडे होते. धर्माधिकारी यांचे ३ जानेवारी २०१९ रोजी निधन झाल्यानंतर या समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले. नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्याऐवजी ही समिती रद्दबातल करून राष्ट्रीय हरित लवाद वा अन्य केंद्रीय विभागाअंतर्गत या समितीच्या फेररचनेचा प्रस्ताव ठेवल्यानंतर या विरोधात पर्यावरणवादी संस्था आणि नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याचिकेवरील निर्णयाला अधीन राहून समिती गठीत केल्याची माहिती डॉ. सतीश गारकोटी यांनी २७ ऑक्टोबर रोजी इतर शासकीय विभागांना कळविली. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने १९९८ दरम्यान वाढवण येथे बंदर उभारण्याच्या प्रकल्पाच्या अर्जावर प्रतिकूल अभिप्राय दिला होता. याशिवाय इतर अनेक मुद्दय़ांवर या प्राधिकरणाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून निर्णय दिले होते. वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बंदर प्रकल्प उभारण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. फेररचना झालेल्या देखरेख समितीचे अध्यक्ष पद नागरी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे देण्यात आले आहे.

स्थानिकांना डावलले

यापूर्वी अस्तित्वात असलेल्या समितीमध्ये डहाणूच्या नगराध्यक्षांसह पर्यावरण संस्थेची संलग्न असणाऱ्या डहाणूमधील दोन प्रतिनिधींना या समितीवर काम करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र डहाणूच्या पर्यावरण संरक्षणासाठी असलेल्या समितीत सद्य:स्थितीत एकही स्थानिक सदस्य नसल्याचे दिसून आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:05 am

Web Title: environment protection authority dahanu dd70
Next Stories
1 तारापूर एमआयडीसीतील नाल्यात घातक रसायन
2 सरकारी जागेवरील अतिक्रमणाचा पेच कायम
3 मुद्रांक शुल्क सवलतीनंतर दस्त नोंदणी वेगात
Just Now!
X