कधी मंजुरीसाठी विलंब तर कधी कंत्राटदार कंपनीतील वाद यामुळे रडतरखडत सुरू असणारी समांतरची गाडी रुळावर आली असून १ सप्टेंबरपासून पाणीपुरवठय़ाची योजना कंत्राटदाराच्या स्वाधीन केली जाणार आहे. मीटरने पाणी देण्याच्या या योजनेचे काम हाती घेण्यास आता कोणताही अडथळा नसल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जमलेच तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेच्या कामाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी ठेकेदार कंपनीने सुरू केलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आली.
 जायकवाडी जलाशयातून १५६ दलघमी पाणी उचलले जात असे. नव्याने २०४१ मधील जनगणना लक्षात घेऊन ३४८ दलघमी पाणी उपसा होईल व वर्षभरानंतर एक दिवसाआड तर तीन वर्षांने काम पूर्ण झाल्यास दररोज पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. या योजनेची मूळ किंमत ७१२ कोटी १९ लाख एवढी असली तरी झालेला विलंब खूप अधिक आहे. त्यामुळे सुमारे १२५० कोटी रुपयांपर्यंत पाणी योजनेचा खर्च होईल, असे अधिकाऱ्यांना वाटते. मूळ किमतीतच ठेकेदाराला हे काम करून द्यावे, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचे ३९९ कोटी ६१ लाख तर विकासकाला ३९२ कोटी ६८ लाख टाकावे लागतील, असे कागदोपत्री गणित मांडण्यात आले आहे. वाढीव पाणीपट्टी लागू करण्यात आली असून १ सप्टेंबर २०१५ पासून कदाचित मीटरने पाणीपुरवठा केला जाईल. शहरातील नळजोडण्या तपासण्याची मोहीम कंत्राटदार कंपनीने हाती घेतली आहे. १ सप्टेंबरपासून योजना ठेकेदाराकडे जाणार असल्याने त्यांनी १७ व्यवस्थापक, ६४ अभियंते व कर्मचारी नियुक्त केले आहेत. या शिवाय महापालिकेतील ३०० कर्मचारीही वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे ७५० ते ८०० कर्मचाऱ्यांच्या जोरावर ठेकेदार कंपनी हे काम करेल, अशी माहिती महापालिकेचे अभियंता सखाराम पानझडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोणते काम किती टक्के पूर्ण झाल्यावर ठेकेदाराला रक्कम द्यायची, याचा आलेख तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १७ जलकुंभ उभारण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे.
 आतापर्यंत तीन वेळा पाणीपुरवठा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली. १९७४-७५ मध्ये पहिल्यांदा तर १९९०-९१ मध्ये व्याप्ती वाढविण्यात आली. भविष्यात जायकवाडीतून ३४८ दलघमी पाणी उपसण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपट्टीची आकारणीही आता ठेकेदार संस्थेकडून केली जाणार आहे. पाणीपट्टीच्या पावत्या संगणकावर काढल्या जातील. शहरात ६ ठिकाणी या ठेकेदार कंपनीची कार्यालय असतील. नवीन जोडणीसाठी अगदी ‘डोअर स्टेप’ योजनाही असेल. पाणीपुरवठय़ाच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकही (०२४०-६६५५०००) देण्यात आला आहे. ठेकेदार कंपनीने कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रभागनिहाय स्वतंत्र कंत्राटदारही नेमले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी रसायने व टँकरचा कंत्राटदारही नियुक्त केला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे १ सप्टेंबरपासून ही योजना ठेकेदाराला चालवायला दिली जाईल. योजना सुरू झाल्यानंतर १७ वर्षे त्याची देखभाल-दुरुस्तीही कंत्राटदारच करणार असल्याने तो निम्न दर्जाची यंत्रसामुग्री वापरणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. या पत्रकार बैठकीस महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, नगरसेवक गजानन बारवाल, मीर हिदायतअली, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते.