खरीप हंगामात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पसेवारी जाहीर होऊन दुष्काळ जाहीर झालेल्या गावातील बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. असे मदतप्राप्त क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यामुळे जिल्ह्यात नुकतेच दोन दिवस अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे पंचनाम्याचे आदेश आता नाममात्रच ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कमी पाऊस पडला. पावसाची सरासरी ५२ टक्के नोंदविली गेली. ७०७ गावांमध्ये पीक पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने सर्वच गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे दुष्काळग्रस्त बाधीत शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतीचे पॅकेज जाहीर केले.
जिल्ह्यात ५५ हजार ७९८ बहुभूधारक बाधीत शेतकरी, तर २ लाख ५५ हजार ११९ अल्पभूधारक शेतकरी असे एकूण २ लाख ६१ हजार ६१७ शेतकरी आहेत. बाधीत जिरायत क्षेत्र १ लाख ६२ हजार ६६६.९९ हेक्टर, बाधीत बागायत क्षेत्र ९ हजार ४७९.३३ हेक्टर, तर बाधीत बहुवर्षीय फळपीक क्षेत्र ९६१.५५ हेक्टर आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १३२.९९ कोटीचे पॅकेज जाहीर केले. पकी २ दोन टप्प्यात ११०.९३ कोटींचा निधी प्राप्त झाला. बाधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्याचे काम चालू आहे.
जिल्ह्यात गेल्या २८ फेब्रुवारी व १ मार्च असे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. परिणामी शेतकरी चांगलाच आíथक संकटात सापडला. राज्य सरकारच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर शेतकरी वर्गात आíथक मदत मिळणार असल्याने आशा निर्माण झाली.
परंतु राज्य सरकारने ३ मार्चला घेतलेल्या निर्णयामध्ये नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झालेल्या गारपिट व अवेळी पाऊस यामुळे नुकसानीच्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रावर या अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, खरीप हंगामात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पसेवारी जाहीर होऊन दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील ज्या क्षेत्रासाठी मदत देण्यात आली अथवा त्यासाठी मदत देण्यात येणार आहे, त्या क्षेत्राचे पंचनामे करण्याची गरज नाही. म्हणजेच यापूर्वी मदतप्राप्त क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रापकी ज्या ठिकाणी अवेळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या क्षेत्राचे पंचनामे करावेत, असे म्हटले आहे.
तसेच अवेळी पावसामुळे नुकसान झाले, त्या ठिकाणी नुकसानीचे सर्वेक्षण करताना या ठिकाणच्या नुकसानीचे छायाचित्र काढून त्या खाली शेत मालकाचे नाव, गट नंबर, सव्र्हे नंबर, गाव आदी माहिती त्री-सदस्यीय पथकाने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी, प्राप्त माहितीवरून नुकसानीची खात्री करून जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा अंतिम अहवाल विहीत प्रपत्रामध्ये सरकारकडे सादर करावा, तसेच पडझड घरे, दगावलेली जनावरे, मृत, जखमी व्यक्ती आदींबाबतही पंचनामे करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे कळविले आहे.
या घडामोडी पाहता सरकारने ठरविल्याप्रमाणे खरीप हंगामात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पसेवारी जाहीर होऊन दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये ज्या क्षेत्रासाठी मदत देण्यात आली अथवा त्यासाठी मदत देण्यात येणार आहे, त्या क्षेत्राचे पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले असताना िहगोली जिल्ह्यात ७०७ गावातील पसेवारी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी असल्याने आता अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे होणारे पंचनामे नाममात्रच ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.