पांढरकवडा येथून यवतमाळकडे येणाऱ्या रात्रीच्या एका बसमध्ये गरोदर महिलेने बाळास जन्म दिल्यानंतर त्याला बसमध्येच सोडून ती फरार झाली. बस आगारात नेण्यापूर्वी वाहक व चालकाच्या ही बाब निदर्शनास आली. हे नवजात बालक सीटखाली मृतावस्थेत आढळले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्या निर्दयी मातेचा शोध सुरू आहे.

सोमवारी रात्री ८ वाजता पांढरकवडा आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८८२४) यवतमाळकरिता निघाली. मार्गातील प्रत्येक गावातून प्रवाशी बसमध्ये चढ-उतार करत होते. रात्रीची वेळ असल्याने चालकाने बसमधील दिवे बंद केले.

या अंधारातच बसमधील एका गरोदर महिलेने कोणासही अंदाज न येऊ  देता मागच्या सीटवर एका बाळाला जन्म दिला. आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही, याची खात्री झाल्यानंतर ही महिला बाळास बसमध्येच सोडून पसार झाली. यवतमाळ बसस्थानकावर सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर वाहकाने बसमध्ये चक्कर मारली तेव्हा मागच्या सीटकडून रक्ताचा पाट वाहत असल्याचे आढळले. त्यांनी मागील आसनाखाली बघितल्यानंतर तिथे एक नवजात बाळ मृतावस्थेत आढळले. त्यांनी लागलीच ही माहिती बसस्थानकावर उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना दिली.

यवतमाळ बसस्थानक प्रमुख उजवणे, सहायक वाहतूक निरीक्षक दिगंबर गावंडे, कर्मचारी जितेंद्र दवारे आणि सदर बसचे चालक- वाहक यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपूर्द केले. पोलीस अधिक तपास करीत असून त्या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.