अमेरिकेत भरघोस पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवल्याने ब्रह्मोस एरोस्पेसचा अभियंता निशांत अग्रवाल याने क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याचे समोर आले आहे.

ब्रह्मोस एरोस्पेसनचा अभियंता निशांत अग्रवाल याला दोन दिवसांपूर्वी नागपूरमधून अटक करण्यात आली. निशांत अग्रवाल हा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. निशांत अग्रवालला भूलवण्यासाठी तीन वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंट्सचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. पाकिस्तानमधील आयएसआयच्या एजंट्सनी निशांतला अमेरिकेत भरघोस पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते, अशी माहिती या प्रकरणाच्या तपास पथकातील सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. त्याने पाकिस्तानच्या एजंट्सना ब्रह्मोस मिसाईलचे कोडिंग पाठवले होते, अशी माहितीही उघड झाली आहे.

पाकिस्तानमधून मुलींच्या नावाने फेसबुकवर तीन अकाऊंट्स सुरु करण्यात आले होते. निशांत यातील दोन तरुणींच्या नियमित संपर्कात होता. निशांत त्या मुलींशी ऑनलाइन चॅटिंग करु लागला. त्याने डीआरडीओ आणि ब्रह्मोस विषयीची गोपनीय माहिती त्यांना दिली, असे सूत्रांनी सांगितले.

सीमा सुरक्षा दलातील जवान मिश्रा याला महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिल्लीतून अटक केली. या तपासादरम्यान अग्रवालवर पोलिसांना संशय आला. ही बाब एटीएसने महाराष्ट्र एटीएसला कळविली. महाराष्ट्र एटीएसने एक आठवडा अग्रवालवर पाळत ठेवली. त्याची संपूर्ण माहिती मिळवून उत्तर प्रदेश एटीएसला दिली. त्यानंतर या दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाईत अग्रवालला ताब्यात घेतले.

एनआयटी रुरकीतून शिक्षण

निशांत हा उच्चशिक्षित कुटुंबातील आहे. त्याने कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एनआयटी) २०१४ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी रुरकी येथील संशोधक म्हणूनही काम केले. त्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्येही नोकरी केली. त्यानंतर २०१४ पासून तो ब्रम्होस एरओस्पेश अंतर्गत नागपुरात कार्यरत असून वर्धा मार्गावरील उज्वलनगर येथे मनोहर काळे यांच्या घरी भाडय़ात राहात होता. ३१ मार्च २०१८ मध्ये क्षितिजा हिच्याशी तो विवाहबद्ध झाला. त्याला आईवडील व एक बहिण आहे.