बोईसर व तारापूर औद्योगिक वसाहती च्या ग्रामपंचायतीमध्ये वाढत असलेल्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बोईसर व परिसरात १२ ताप निदान केंद्र (फिवर क्लिनिक) उभारण्यात येणार असून मध्यवर्ती ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

तारापूर औद्योगिक वसाहत परिसरामध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांची संख्या पाहता पालघरचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक केली असून बोईसर, खैरेपाडा, सरावली, बेटेगाव, मान, सालवड, पास्थळ व तारापूर या ग्रामपंचायती अंतर्गत इतर विभागांची मदत घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याखेरीज बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पाच, सरावली मध्ये दोन तसेच खैरेपाडा, सालवड, पास्थळ, कलवडे व पाम या गावात ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक ताप निदान केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राच्या ठिकाणाची पाहणी गट विकास अधिकारी, साहायक गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली असून ही केंद्र तातडीने सुरु करण्याच्या दृटीने कामे हाती घेण्यात आली आहेत.

बोईसर तसेच औद्योगिक वसाहतीमधील कामगार व नागरिकांसाठी तारापूर इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) कार्यालय शासनाने अधिग्रहित केली आहे. या ठिकाणी आजार नियंत्रण कक्ष व ताप निदान केंद्र उभारण्यात येत आहे. त्याचबरोबरीने याठिकाणी तपासणी केंद्रांच्या सुविधा सुरू करण्यात येत असल्याने आजाराचा वाढता संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जव्हार, मोखाडा, विक्रमगड व तलासरी येथील कोविड केअर सेंटर मधील मनुष्यबळासह व्यवस्थापन करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बोईसर व परिसरात समर्पित करोना उपचार केंद्राची उभारणी करण्यासाठी तारापूर येथील उद्योजक तसेच शासकीय अधिकारी यांच्या समवेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एकंदरीत बोईसर परिसरातील करोना रुग्णांचा वाढता आलेख रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन उपाययोजना आखण्याची आरंभ केला आहे.