नगरमधील भाजपचा विजय हा मोदी लाटेचाच भाग आहे, त्याला धनशक्तीची जोड मिळाल्याने मताधिक्य वाढले, ही लाट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकणार नाही, पराभव झाला असला तरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सज्ज आहोत, असे मत राष्ट्रवादीचे नगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

जे देशात झाले, तेच चित्र नगरमध्ये दिसले, त्यामुळे जनतेचा कौल आपण मान्य करतो, प्रचारात कोठेही स्थानिक प्रश्नांचे मुद्दे नव्हते, लोकांनी केवळ मोदींचा चेहरा पाहून मतदान केले, आपली उमेदवारी केवळ २२ दिवस राहिले असताना जाहीर झाली, त्या तुलनेत चांगली मते मिळाली, पुरेसा अवधी मिळाला असता तर वेगळे चित्र पहावयास मिळाले असते, असा दावा करताना आ. जगताप यांनी मतदारांचे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच कोणी गद्दारी केल्याचा त्यांनी इन्कार केला. तसेच मतदान यंत्रांना दोष देण्यासही नकार दिला. आपण त्यादृष्टीने विचार केलेला नाही किंवा आपल्याला तसे वाटत नाही, असेही आ. जगताप म्हणाले.

मतदानापूर्वी मोदी लाट जाणवत नव्हती, ती प्रत्यक्षात मतदानातून दिसली तरी एवढा एकतर्फी बदल होईल, असे वाटत नव्हते, पक्षाचा आदेश होता म्हणूनच लोकसभा निवडणूक लढलो, हे खरे असले तरी त्यामागे माझी अनिच्छा होती, असे नाही. असेही त्यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभेसाठी वेगवेगळे मत, विचार प्रवाह असतात, आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत, त्याच्या हिशेबासाठीही तयार आहोत, मोदी लाट विधानसभेपर्यंत टिकणार नाही, ज्यांना ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे अनुभव मिळत नाही, तेवढे मला लहान वयात मिळाले, तरुण वयातच महापौर पद मिळाले, विधानसभा निवडणूक, गेल्या वर्षीचे प्रकरण (केडगाव), आताची लोकसभा निवडणूक यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळाले, असेही आ. जगताप म्हणाले.

महापौर पदासाठी भाजपला महापालिकेत दिलेला पाठिंबा व लोकसभा निवडणूक यांचा परस्परांशी काही संबंध नाही, महापौर पदाचा पाठिंबा हा स्थानिक विषय होता, असा दावा त्यांनी केला.