करोना संसर्गाचा धोका असतानाही मिरजेतील तरुण शल्यविशारद तुषार धोपाडे दर आठवडय़ाला दहा रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया करून आव्हानात्मक स्थितीमध्ये हृदयविकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना जीवनदान देत आहेत.

एका कवीने म्हटले आहे की, जीवन म्हणजे दोन श्वासातील अंतर, मात्र हे अंतरच कधी कधी वेदनादायी असते. या वेदना दूर करण्याचे काम वैद्यकीय तज्ज्ञ करीत असतात. मिरजेतील सेवासदन रुग्णालयात कार्यरत असलेले तरुण शल्य विशारद तुषार धोपाडे आजच्या आव्हानात्मक स्थितीमध्येही बा रुग्ण विभागात हृदय रोगाचे निदान करण्यापासून गरजूंवर शस्त्रक्रिया करण्याचे जोखमीचे काम करीत आहेत.

गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये त्यांनी तब्बल ६०० जणांची हृदय शत्रक्रिया करून त्यांना दिमाखात जगण्याचे बळ देण्याची किमया साधली आहे. दोन वर्षांच्या बालकापासून ८५ वर्षांच्या वयस्कर रुग्णाबाबत यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. डॉ. तुषार यांनी अल्पावधीतच निष्णात शल्य चिकित्सक म्हणून नाव लौकिक प्राप्त केला आहे. डॉ. रविकांत पाटील यांनी हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी भव्य सेवासदन रुग्णालय सुरू केले असून येथे असलेल्या अत्याधुनिक साधनामुळे अत्यवस्थ स्थितीत पोहोचलेले रुग्णही चार दिवसांत घरी परतून नित्याच्या कामात व्यस्त होत आहेत.

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहार-विहारातील बदल आणि सततचे स्पर्धात्मक जीवन याचा ताण हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यावर येत आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची जीवन पद्धती आणि आताची जीवन पद्धती यामध्ये बदल झाला असून बदलत्या काळात प्रत्येकाला काही तरी प्राप्त करण्यासाठी स्पर्धा करावी लागत आहे. या स्पध्रेमुळे ताण-तणाव वाढत जातात. याचा परिणाम हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यावर होत असतो. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तवाहिन्यामध्येही नसíगक अडथळे निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो. यातूनच हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत.

मिरज-सांगलीमध्ये एवढय़ा कमी वेळेत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात सेवासदन हॉस्पिटलचे नाव अग्रहक्काने घेतले जाते. यामागे तत्काळ निदान हे जसे कारण आहे तसेच अत्याधुनिक पद्धतीने उपचार पद्धतीही कारणीभूत आहे. या कामामध्ये पॉल चाको, स्वाती पाटील, अपर्णा पुरोहित, हर्षल, सुनील शाहूल यांचे मोलाचे योगदान असल्याचे डॉ. तुषार धोपाडे यांनी सांगितले.

६०० हून अधिक शस्त्रक्रिया

आता शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून हृदय शस्त्रक्रियेसाठीही मदत मिळते, यामुळे रुग्णाचे नातेवाईक कोणताही धोका पत्करण्यापेक्षा शत्रक्रिया करण्यास तयार होतात. यामुळे गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये ६०० हून अधिक रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यापकी ९८ टक्के रुग्ण आज आपले जीवन सामान्यपणे व्यतीत करीत आहेत.