राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आता सायंकालीन बाह्य़रुग्ण सेवा उपलब्ध होणार आहे. राज्याच्या आरोग्य संचालकांनी तसे आदेश सर्व जिल्हा रुग्णालयांना दिले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आता सकाळ प्रमाणेच संध्याकाळी ४ ते ६ यावेळेत बाह्य़रुग्ण सेवा उपलब्ध होणार आहेत.    राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये पूर्वी सकाळ- संध्याकाळी बाह्य़रुग्ण सेवा अर्थात ओपीडी सेवा उपलब्ध होत असे. मात्र मध्यंतरीच्या काळात सायंकालीन बाह्य़रुग्ण सेवा अचानकपणे बंद पडली होती. मात्र आता रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सायंकालीन बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. आरोग्य संचालकांच्या कार्यालयात मुंबई येथील मासिक सभेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या सूचना       या निर्णयानुसार आता सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी ८.३० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ६ या काळात शनिवार आणि रविवार वगळता बाह्य़रुग्ण सेवा उपलब्ध होणार आहे. शासकीय रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, तांत्रिक कर्मचारी, आणि प्रमाणपत्र विभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य संचालकांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. रुग्णांना दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्य सुविधा द्यावी हा या निर्णया मागचा उद्देश आहे. जिल्ह्य़ातील सर्व शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तर रुग्णांनीही या सायंकालीन बाह्य़रुग्ण सेवेचा जास्तीत जास्त फायदा घेण आवश्यक असल्याचे रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितले आहे.