राज्यातील शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत ४३ टक्के जागा रिक्त असून अनेक खासगी महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उघडणे शक्य नाही, अशी स्पष्ट कबुली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्याचे शासनाचे धोरण आहे काय? असा प्रश्न नागो गाणार, अनिल सोले यांनी उपस्थित केला होता. सध्या अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झालेला असल्याने अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही महाविद्यालये बंद करून मंगल कार्यालये करावी काय, या विचारावर महाविद्यालयांचे संचालक आले आहेत. अशा स्थितीत नवीन महाविद्यालयाना परवानगी देणे अशक्य आहे, असे तावडे म्हणाले.
‘पोषण आहाराच्या चौकशीसाठी समिती विचाराधीन’
नागपूर:अंगणवाडीच्या मुलांना दिले जाणारे आहार सकस आणि पुरशाप्रमाणात दिले जातात किंवा नाही, याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. डॉ. मिलिंद माने यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती.
पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी नोंदणीकृत महिला बचत गटांचे नाव व कागदपत्रे वापरून पुरवठा  कंत्राटदार महिलांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले आहे. या योजनेवर कंत्राटादारांचा ताबा झाला आहे, अशी लक्षवेधी मांडण्यात आली होती.