चित्रपटात दाखवतात तसंच खऱ्या आयुष्यात होत नसतं, प्रत्येक बेपत्ता मुलगी प्रियकरासोबत पळून गेलेली नसते अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटाकरलं आहे. ठाण्यातून गतवर्षी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीला शोधण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना फटकारताना न्यायालयाने म्हटलं की, प्रत्येक बेपत्ता व्यक्ती प्रियकरासोबत पळून गेलं असेल असा विचार करणं आधी बंद करा.

न्यायाधीश एससी धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने म्हटलं की, ‘आम्ही पोलिसांच्या या विचारसरणीमुळे आश्चर्यचकित आहोत. तपास पथक आणि वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रकरणाकडे अशाप्रकारे पाहिलं नाही पाहिजे. एखादी तरुणी बेपत्ता झाली असेल तर ती प्रियकरासोबतच पळून गेली असेल अशा विचार करणं बंद केलं पाहिजे. चित्रपटात जे दाखवलं जातं तसा विचार केला जाऊ नये’.

न्यायालयाने सांगितलं की, ‘अधिकाऱ्यांनी हे खरं आयुष्य आहे आणि येथे खरोखर पीडित लोक आहेत जे आपली मुलं बेपत्ता झाल्याने दुखी आहेत हे विसरु नये. विचार बदलण्याची सध्या खूप गरज आहे’. एका बेपत्ता तरुणीच्या वडिलांकडून दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालायने हे मत नोंदवलं आहे. पोलीस तपासात अत्यंत दिरंगाई करत असून, त्यांनी वेगाने तपास करावा अशी तरुणीच्या वडिलांनी मागणी केली होती.