22 July 2019

News Flash

दरवर्षी सर्पदंशाचे ८० हजार बळी

व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यालगतच्या गावांमध्ये प्रामुख्याने सर्पदंशाच्या घटना घडतात.

(संग्रहित छायाचित्र)

उपचार सुविधांचा अभाव, तसेच मांत्रिकाकडे जाण्याच्या वृत्तीने मृत्यूचे प्रमाण अधिक

राखी चव्हाण/महेश बोकडे, नागपूर

राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये असलेल्या उपचाराच्या सुविधेचा अभाव यामुळे मृत्युच्या सर्वाधिक घटनांची नोंद देखील याच भागात आहे. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यालगतच्या गावांमध्ये प्रामुख्याने सर्पदंशाच्या घटना घडतात. मात्र, उपचाराच्या सुविधांचा अभाव आणि सर्पदंशावरील उपचाराकरिता तांत्रिक, मांत्रिकांकडे जाण्याची त्यांची प्रवृत्तीही त्यांना मृत्युच्या खाईत ढकलत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी ८० हजार लोक सर्पदंशाचे बळी ठरतात.  पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या दोन गावांमध्ये एकाच दिवशी झालेल्या दोन मृत्युने पुन्हा एकदा सर्पदंश आणि त्यावरील उपचाराच्या सुविधांचा प्रश्न समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे अटल आरोग्य सेवेअंतर्गत सर्पदंशावरील उपचाराकरिता अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम रुग्णवाहिकेत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रुग्णवाहिका येते आणि सर्पदंशाने पिडित व्यक्तीतवर तात्काळ उपचार होतो. आतापर्यंत याठिकाणी सुमारे ६४ सर्पदंशाच्या रुग्णांना उपचार मिळाले आहेत. महाराष्ट्रात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असूनही अशाप्रकारची कोणतीही सुविधा नाही. एवढेच नाही तर जंगलालगतच्या अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवल्यास ७० ते १०० किलोमीटरचे अंतर तुडवत त्यांना जावे लागते. ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहेत, त्याठिकाणी सर्पदंशावरील उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी अनेकदा त्यांना मृत्यु पत्करावा लागतो. पावसाळ्यांच्या दिवसात सर्पदंशांच्या घटनांमध्ये वाढ  होते. त्यामुळे पावसाळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर ‘अ‍ॅन्टीव्हेनम’ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असून ३१ ऑगस्टला एकाच दिवशी दोन गावकऱ्यांचा सर्पदंशाने मृत्यु झाला. सर्पदंशानंतर तब्बल तासभर उपचार मिळाले नाही आणि मृत्यू पत्करावा लागला. ही घटना फक्त पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील आहे. मात्र, प्रत्येकच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यालगतच्या गावांमध्ये ही स्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराची वानवा असल्याने गावकऱ्यांना मृत्युशिवाय पर्याय नाही. जंगलालगतच्या गावांमध्येच सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. त्यामुळे याठिकाणी ‘अ‍ॅन्टीव्हेनम’उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी ते असत नाही. या गावांमध्ये सातत्याने वैद्यकीय उपचारांची वानवा असते. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रकरणात घाटपेंढरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालय सुरू करण्याची मागणी होती, पण जमीन नसल्याचे कारण पुढे करत रुग्णालय होत नव्हते. मागीलवर्षी वनखात्याने येथे रुग्णालयासाठी जमिनीची मान्यता दिली होती, पण रुग्णालय झालेच नाही. अतिदुर्गम भागात दरवर्षी उपचाराअभावी अकाली मृत्यूच्या घटना वाढत आहेत.

सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचार काय करावेत याविषयी अजूनही पुरेशी जनजागृती नाही. अनेक प्रथमोपचाराचे पर्याय हे चुकीचे आहेत. त्यामुळे साप चावल्यानंतर पहिले पाऊल कोणते उचलावे, याविषयी गावकऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. अनेक सर्पमित्रांना योग्य प्रथमोपचाराची माहिती आहे. गावांमध्ये मात्र असे नाही. कित्येकदा ते भोंदूबाबांकडे नेऊन उपचार करतात. म्हणूनच आता सातपुडा फाउंडेशनने गावांमध्ये सर्पदंशांविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. बुवाबाजीकडे न जाता प्रथमोपचाराचे महत्त्व त्यांना पटावे अशा पद्धतीने जनजागृती चित्रफित तयार करुन त्यांना दाखवली जाते. यात विषारी व बिनविषारी साप कसे ओळखायचे, दंश झाल्यानंतर काय करायचे, अशा पद्धतीने प्रशिक्षण त्यांना देण्यात येत आहे.

– मंदार पिंगळे, संवर्धन अधिकारी, सातपुडा फाउंडेशन

२०१७ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक आकडेवारी जाहीर केली होती. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर दरम्यान भारतात सर्पदंशामुळे एकूण १.१४ लाख मृत्यू झाल्याचे यात होते. यातील ९१ हजार ८७१ घटना ग्रामीण भागातील आहेत. यात महाराष्ट्राचा क्रमांक २४ हजार ४३७ घटनांसह पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर पश्चिम बंगाल २३ हजार ६६६ आणि आंध्रप्रदेश १० हजार ७३५ सर्पदंशाच्या घटना होत्या. महाराष्ट्रातील २४ हजार ४३७ घटनांपैकी १९ हजार ०१२ घटना ग्रामीण क्षेत्रातल्या तर पाच हजार ४२५ घटना शहरी क्षेत्रातील आहे.

अ‍ॅन्टीव्हेनमची  (दहा एमएल) उपलब्धता

* भंडारा जिल्हा             ११९३

* चंद्रपूर जिल्हा            ५५९२

* गडचिरोली जिल्हा     १५०५०

* गोंदिया जिल्हा           ६८७९

* नागपूर जिल्हा            १९६७

* वर्धा जिल्हा                 १९२२७

First Published on September 7, 2018 3:04 am

Web Title: every year 80 thousand people die due to snake bite