बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात भाजपाने बिहारी जनतेला मोफत करोनाची लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर इतर अनेक राज्यांनी देखील मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही मोफत करोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा अल्पसंख्यांक आणि कामगार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मलिक म्हणाले, “बिहारमध्ये भाजपा हरली तरीही देशभरात मोफतच लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारने मोफत लसीकरण केले अथवा केले नाही तरी आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मोफत करोनाची लस देऊ. भाजपाने बिहारमध्ये आम्ही जिंकलो तर करोनाची लस मोफत देऊ असं म्हटलं आहे. भाजपाची ही भूमिका संपूर्ण देशातील लोकांवर अन्याय करणारी आहे, असं आम्हाला वाटतं. देशातील सर्व जनतेला लस देण्याची जबाबदारी सरकारची आहे.”

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस करोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती

नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे देशात करोनाचं संकट

देशात करोनाचं जे काही संकट निर्माण झालं त्याची संपूर्ण जबाबदारी मोदींची आहे. १ जानेवारी रोजी हेल्थ इमर्जन्सीची घोषणा करुन देशाच्या सीमा सील केल्या असत्या तर देशात लॉकडाउन करण्याची गरज पडली नसती. मात्र, ट्रम्प यांच्या प्रेमाखातर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या भानगडीमुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला, करोडो लोक बेरोजगार झाले, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असा आरोपही मलिक यांनी केला.

आता तर प्रत्येक निवडणुकीसाठी भाजपाकडून जनतेला लालूच दाखवली जात आहे. आम्ही तर म्हणतो यांना मतदानच करु नका ते हारतीलच, असेही त्यांनी म्हटलं आहे.