महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन आज (गुरुवार) गोरेगावातील नेस्को मैदानात पार पडणार आहे. या अधिवेशनात विविध विषयांवरील ठराव मांडण्यात येणार आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार आहेत. राज ठाकरे पुन्हा एकदा भगवी पताका खांद्यावर घेऊन हिंदुत्वाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ शिवसैनिकाने मनसेला या नव्या भूमिकेसाठी आशीर्वाद दिले आहेत. या शिवसैनिकाबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या ज्येष्ठ शिवसैनिकाच्या शुभेच्छांची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मनसेने त्या शिवसैनिकाचे आभार मानताना म्हटले आहे की, “खरंतर दोन व्यक्तिंमधील खाजगी संभाषण हे जाहीर करू नये हा संकेत असतो. पण त्या संभाषणाला जर आशीर्वादाची, सदिच्छांची किनार असेल तर कधीतरी संकेतभंग करायला देखील हरकत नाही. हे ज्येष्ठ शिवसैनिक अनामिक आहेत, पण आम्हाला ते वंदनीय आहेत.”

मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील यांना त्यांनी महाअधिवेशनाबाबत मांडलेल्या भूमिकेचे कौतुक करीत या ज्येष्ठ शिवसैनिकाने फोनवरुन शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. याची ऑडिओ क्लीपही मनसेने ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध केली आहे. मनसेच्या नव्या भुमिकेबद्दल आशीर्वाद देणाऱ्या ७० वर्षांच्या या ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव माधव लेले असून ते मुंबईचे रहिवासी आहेत.

पाटील यांच्याशी बोलताना लेले म्हणतात, “मी ६७ मधील साहेबांचा (बाळासाहेब ठाकरे) सैनिक आहे. पूर्वी मोरारजींची (माजी पंतप्रधान मोरारजी देसाई) गाडी अडवायला आम्ही जायचो पण आता अंगात शक्ती राहिलेली नाही. आत्ताचे लोक विचारांशी ठाम नाहीत. पूर्वीचे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम होते. आता मनसेनं त्याप्रमाणे रस्त्यावर उतरुन मोठं आंदोलन उभारायला पाहिजे”