दोन वर्षांच्या लेकीची कुंकवात भिजवलेली पाऊले घरात आणलेल्या नव्या कोऱ्या गाडीवर उमटवून पूजा करणाऱ्या पित्यानं थेट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या काळजालाच हात घातला. त्यामुळे कारची पूजा करतानाचा हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह अशोक चव्हाण यांनाही आवरता आला नाही. विशेष म्हणजे मंत्रालयातून कामाला सुरूवात केल्यानंतर चव्हाण यांनी पहिला फोनही लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या ‘त्या’ पित्यालाच केला.
नव्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या अशोक चव्हाण यांना टिकटॉकवरील एका व्हिडीओनं भुरळ घातली. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवीन कार खरेदी केली. त्या कारची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती.
सोशल मीडियानं घडवून आणला संवाद
टिकटॉकवरील हा व्हिडीओ अशोक चव्हाण यांच्यापर्यंत व्हॉट्पअपवरून पोहोचला. लेकीविषयी प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडीओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करून एक पिता म्हणून स्वतःच्या भावनादेखील व्यक्त केल्या होत्या.
लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा VDO मी काल शेअर केला होता.
हा VDO बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आजच मंत्रालयातून कामकाजास सुरूवात केली व पहिला फोन त्यांनाच केला.https://t.co/tjJsJi6X6J https://t.co/gzS9fdrZCn pic.twitter.com/Ruom75wtvB— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 8, 2020
हा टिकटॉक व्हीडीओ तयार करणारे नागेश पाटील यांच्यापर्यंतही ती पोहोचली. रात्री उशिरा त्यांनी ट्विटरवरून चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. चव्हाणा यांनी सकाळी ते ट्विट पाहिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयातून काम सुरू केल्यानंतर चव्हाण यांनी पहिला फोन नागेश पाटील यांनाच लावला. नागेश पाटील हे वाहनचालक असून, ते पुण्याला खासगी नोकरी करतात. चव्हाण यांच्या ट्विटला रात्री उत्तर दिल्यानंतर सकाळीच अशोक चव्हाण यांनी फोन केल्याने ते भारावून गेले. नागेश पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणात चव्हाण यांनी या व्हिडीओ मागील भावनेचे कौतूक केले आणि भेटण्याचं आश्वासनही दिले.
मोबाईलवर हा VDO नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय.
दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल! pic.twitter.com/eDYBdBLfFk— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 7, 2020
चव्हाण नक्की काय म्हणाले होते?
चव्हाण यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना चव्हाण म्हणाले होते की, “मोबाईलवर हा व्हिडीओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं, त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं. त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल!”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2020 2:46 pm