पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सलग बाराव्या दिवशी वाढ झाल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. ‘भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर आहे’, असे ट्वीट करून त्यांनी या दरवाढीचा निषेध नोंदवला आहे.
अशोक चव्हाण गेले काही दिवस दररोज महाराष्ट्रातील पेट्रोलचे वाढते दर ट्वीट करून पेट्रोलची शंभरी जवळ आल्याचे उपरोधिक स्वरूपात निदर्शनास आणून देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसाठी मागील केंद्र सरकारांना जबाबदार ठरवले होते. त्यालाही चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्याबाबत केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी नमूद केले होते की, ‘एप्रिल २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलर असताना मुंबईत पेट्रोल ८० अन् डिझेल ६३ रूपयांना मिळत होते. आज कच्चे तेल ६५ डॉलरला असताना मुंबईत पेट्रोल ९६.३० तर डिझेल ८७.३० रूपयांवर आहे. यासाठी केवळ मोदी सरकारची नफेखोरी कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत असताना मोदी सरकारने सतत कर वाढवले. सर्वसामान्यांच्या खिशावर तब्बल २० लाख कोटी रूपयांचा डल्ला मारला. तेच पंतप्रधान आज पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीसाठी यापूर्वीच्या सरकारांना जबाबदार धरतात, हे हास्यास्पद आहे’.
Which has never happened in the history of India, now it seems that it will happen during the tenure of Modi Government.
The century of petrol price in Maharashtra is just 90 paise away.#PetrolDieselPriceHike #Petrol100 pic.twitter.com/3xOUrcyKFp— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 20, 2021
तुम्ही सात वर्षांत काय केलं? – पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, अशोक चव्हाण यांचे काँग्रेसमधील सहकारी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पेट्रोल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले?’ असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 8:19 pm