महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने जिल्हा बँकेला दिलेले दोन धनादेश न वटल्याप्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर माजी आमदार तथा पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष मनिष जैन यांच्यासह दोघांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने एक वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे दोन वेगवेगल्या निकालात एकूण ११ कोटीची भरपाई महिन्याच्या आत भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
महावीर सोसायटीने जिल्हा बँकेकडून १० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची फेड म्हणून २००२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष मनिष जैन, संचालक सुरेंद्र लुंकड, सुभाष साखला यांच्या स्वाक्षरीने जिल्हा बँकेला तीन कोटीचा पहिला धनादेश देण्यात आला. त्यानंतर पुन्हा पाच कोटी २८ लाख ३३ हजाराचा दुसरा धनादेश देण्यात आला. हे दोन्ही धनादेश न वटल्यामुळे बँकेचे तत्कालीन कर्मचारी भिला पाटील यांनी तिघांविरूध्द न्यायालयात धाव घेतली. हा खटला तब्बल १२ वर्ष चालला.