किसन वीर यांचे अनुयायी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील (वय ८२ ) यांचे आज (गुरूवार) मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली.

लक्ष्मणराव पाटील यांची राजकीय कारकीर्द ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली होती. बोपेगावच्या सरपंच पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर तात्यांनी राजकारणात कधीही मागे वळून पाहिले नाही. राजकारण, समाजकारण करताना सडेतोड बाणा कधीही सोडला नाही. कडक शिस्त हे राजकारणातले त्यांचे खास वैशिष्ट्य होते. स्पष्ट वक्तेपणा आणि पक्षाने किंवा पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे ही त्यांची ख्याती होती. किसन वीरांनी आणि तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे पार पाडल्या. माजी खासदार प्रतापराव भोसले आणि लक्ष्मणराव पाटील यांची मैत्री पश्चिम महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

शरद पवार यांचे ते निष्ठावंत सहकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणारे ते पहिले पदाधिकारी होते. पवार यांनीही त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची मजबूत घडी बसवत १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून दहा पैकी नऊ आमदार निवडून आणले होते. ते स्वतः व श्रीनिवास पाटील खासदार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे माजी मंत्री डॉ. शालिनी पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून आमदार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सातारा जिल्ह्यातील राजकारणावर त्यांचे वर्चस्व होते. पक्ष संघटनेत त्यांचा शब्द अंतिम मानला जाई . १० वर्षे बोपेगाव सरपंच, १० वर्षे वाई पंचायत समिती सभापती, १० वर्षे किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष , ११ वर्षे जिल्हापरिषद अध्यक्ष, ४० वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक आणि काही वर्षे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता.

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या पत्नी सुमन, आमदार मकरंद पाटील, व्यावसायिक मिलिंद व सातारा जिल्हा बँकेचे संचालक नितीन हे पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.