माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत असलेले शिक्षण महर्षी शांताराम पोटदुखे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. १९८० ते १९९६ या कालावधीत ते खासदार होते. सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक जाळे विणले होते. विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती.

माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते माजी पंतप्रधान आणि तेव्हाचे केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र आरोग्याच्या तक्रारींमुळे मागील १५ वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. मागील काही दिवसांपासून त्वचा आणि दम्याचा त्रास झाल्याने त्यांना चंद्रपूरमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथून त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. दुपारी ३ वाजून २३ मिनीटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष पद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले होते.

त्यांच्या निधनानंतर अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले असे मत त्यांनी व्यक्त केले. शांतारामजी यांचे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. माझे आणि शांतारामजींचे नाते राजकारणापलीकडचे होते असेही मुनगंटीवार म्हणाले. मी त्यांना काका म्हणायचो, माझ्या वडिलांचे ते अतिशय चांगले मित्र होते. त्यांनी माझ्यावर कायम मुलासारखे प्रेम केले. राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारुन नेहमीच कौतुकाची आणि आशीर्वादाची थाप त्यांनी माझ्या पाठीवर दिली.